स्मरण : सहकार क्षेत्रातील संयमी, कर्तृत्ववान नेतृत्व : चरणूकाका पाटील

Charnukaka Patil
Charnukaka Patil

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील चरणूकाका पाटील म्हणजे तालुक्‍यातील माचणूरच्या सिद्धेश्वरनगरी व मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांच्या रूपाने साक्षात लक्ष्मीपुत्र होते. मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष चरणू काका पाटील यांचे नुकतेच निधन झाले. 

चरणूकाका हे ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील असून लहानपणी आर्थिक परिस्थिती साधारण असताना कुस्तीची आवड होती. 1968 मध्ये कोल्हापूर येथे कुस्तीचे धडे शिकून त्यांनी गावाकडे रोजच पहाटे लवकर उठणे, व्यायाम, नदीत स्नान करणे, सिद्धेश्वराचे दर्शन करणे नंतर शेतीची इतर कामे करत. "ज्याच्या शेतात पाणी त्याच्या अंगात पाणी' याप्रमाणे शेतीसाठी किर्लोस्कर इंजिनने पाणी उपसून कापडी पाइपलाइनने सहा एकर जमीन बागाईत केली. शेतातील क्षेत्र भिजत नसल्याचे लक्षात येताच पाणीपुरवठा योजना आणून नदीवरून नळ वितरिकेने शेतीसाठी पाणीपुरवठा केला.

1972 पासून दोन चुलत्यांसह एकत्र कुटुंब पद्धतीची जबाबदारी स्वीकारली. साधी राहणी व उच विचारसरणी या उक्तीप्रमाणे माणसातला माणूस ओळखून प्रसंगावधान पाहून लग्नकार्य, आजारपण, अंत्यविधी, देवकार्य व धर्मासाठी रंजल्या-गांजलेल्यांना मदत करत होते. दारात आलेली कोणीही परिचित-अपरिचित व्यक्ती मोकळ्या हाताने परत गेली नाही. काकांच्या बाबतीत म्हणजे कोणाची निंदाही केली नाही व ऐकूनही घेतली नाही. अतिशय शांत, संयमी, साध्या माणसातला देवमाणूस अशी त्यांची ओळख होती. 

एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श ठेवून 75 माणसांच्या कुटुंबाचा संसार सांभाळत होते. तसेच गावातील कुठल्याही जातिधर्माचे सुख-दुःख असो प्रथमतः त्यांच्या कुटुंबात सहभागी होत सर्व कामे सोडून पाणीसुद्धा न पिता अंत्यविधी पार पाडत. गावातील लहानमोठ्या लोकांशी त्यांचा लळा होता. काका स्वतः शेतकरी कुटुंबात असल्यामुळे शेतीसह पशुपालनाकडे बालपणापासून जातीने लक्ष देत होते. सांगोला, जवळा, पंढरपूर या ठिकाणी जनावरांच्या आठवडा बाजारात ते स्वतः जाऊन खरेदी-विक्री व्यवहार करत होते. जमिनीवरच पाय ठेवून कधीही अहंकार केला नाही. 

कोणत्याही विद्यापीठाची डिग्री नसताना फक्त सातवीचे शालेय शिक्षण असूनही शेतातील काळ्या मातीच्या आईवर अफाट प्रेम होते. त्यातूनच कष्टाने केलेल्या श्रमाचे श्रमसाफल्य होत असे. चरणूकाका म्हणजे सामाजिक क्षेत्र, सहकार क्षेत्र, राजकीय क्षेत्र व अर्थकारणाची जाणीव असलेला माणूस. तरुणपणात कोल्हापूरच्या तालमीत तयार होऊन आल्याने शेती करीत असताना रात्रंदिवस कष्ट करून मातीतून सोने पिकवायची कला अवगत असलेला अवलिया. 

लोकसेवेसाठी सहकार क्षेत्रात राजकीय गुरू म्हणून माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना चरणूकाकांनी प्रथमत: स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्याशी सख्यत्व ठेवत भीमा सहकरी साखर कारखान्याची घडी बसविली. कारखानदारी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा चुलीच्या प्रश्नासी निगडित असल्याने अतिशय आस्थेने काम केले. (स्व.) यशवंतराव चव्हाण, (स्व.) वसंतदादा पाटील व शरद पवार यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सहकार क्षेत्र महाराष्ट्रात रुजविले. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हाती सहकार क्षेत्र असले पाहिजे तरच शेतकऱ्याचा विकास होऊ शकतो, हे त्यामागील मर्म ते जाणत होते. (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याचे काम करीत असताना कारखान्याची अवस्था अत्यंत वाईट होती. काकांनी दिवसरात्र लक्ष घालून कारखाना पूर्वपदावर आणला. राजकारणात कार्य करीत असताना काकांनी विकास आणि राजकारण कधीच सहकारात आणले नाही. कारखान्याच्या विकासाच्या मुद्‌द्‌यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विकासगंगा घराघरात कशी पोचेल याला प्राधान्य दिला. समाजाच्या विविध स्तरांवर काकांचे बहुमोल सहकार्य असे. 

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत अध्यक्ष (स्व.) कि. रा. मर्दा व (स्व.) रतनचंद शहा या दोघांमध्ये समन्वय ठेवून तालुक्‍यामध्ये असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दामाजी कारखान्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री संत दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष चरणूकाका पाटील यांचे भले मोठे योगदान होते. तालुक्‍यातील भीमा नदीकाठी असणाऱ्या ऊस उत्पादकांना सुरवातीच्या काळात भीमा व इतर कारखान्याला ऊस आतापर्यंत न्यावा लागत असे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना तालुक्‍यातील कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्यांचा राजवाडा व्हावा ही संकल्पना सोबत घेऊन कि. रा. मर्दा व रतनचंद शहा यांच्या घरी दररोज सकाळी व संध्याकाळी रोज भेट घेत असत. त्यांच्या मदतीने शरद पवार यांची भेट घेऊन कारखान्याची जुळवणी केली. तालुक्‍यातील कारखाना परवाना ते जागा निश्‍चितीसाठी प्रयत्न केले. कारखाना स्थापन करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. कारखान्यामध्ये काम करत असताना काटकसरीचा कारभार हा त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी पंढरपूरच्या (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून कारखान्याचा गाडा सुरू केला आणि कामगार व शेतकऱ्यांचे हित साधले होते. 

तालुक्‍यातील ऊस उत्पादक कामगार यांच्यात समन्वय ठेवून कारखान्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी कमी शिक्षण झालेल्या चरणूकाका पाटील यांनी चांगल्या कारखानदारांसमोर एक आदर्श ठेवला होता. संत दामाजी सहकारी संस्थेच्या 2005-06 च्या निवडणुकीत चरणूकाका पाटील यांनी तालुकास्तरावर आपल्या गटाची मोट बांधली. जिल्ह्यातील मातब्बर असलेल्या मोहिते-पाटलांच्या पुरस्कृत पॅनेलचा धक्कादायक पराभव करून जिल्ह्यामध्ये चर्चेत आले होते. कारखान्याच्या सभासद व कामगारांनी चरणूकाका पाटील हा चेहरा बघून भरघोस मताने पॅनेलला विजय केले. 2005 मध्ये बंद पडलेला संत दामाजी साखर कारखाना अध्यक्ष झाल्यानंतर 70 कोटी कर्ज असलेला कारखाना परतफेड करून 15 कोटींवर आणला व यशस्वीपणे चालवून दाखविला. तसेच ब्रह्मपुरी ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून 50 वर्षे बिनविरोध म्हणून पार पाडली. काकांनी (स्व.) सर्जेरावतात्या पाटील, (स्व.) शिवाजीभाऊ पाटील यांच्या माध्यमातून गावात कधीही तंटा होऊ दिला नाही. गावं शांत ठेवण्याची सतत भूमिका घेतली. 

ते भीमा साखर कारखान्याचेही 15 वर्षे संचालक होते. दामाजी साखर कारखान्यामध्ये त्यांनी संचालकपद, उपाध्यक्ष, अध्यक्ष ही सर्व पदे यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेत कारखान्याचा कारभार पहिला. शेतकऱ्यांप्रति त्यांची खूप आस्था होती. त्यांच्या निधनाने तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकरी , कामगार वर्ग पोरका झाला आहे. 

  • राजकीय कारकीर्द : ब्रह्मपुरी ग्रामपंचायत 50 वर्षे बिनविरोध 
  • दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यकाल : 1989 ते 1996 
  • स्थापनेपासून दामाजी शुगरचे संचालक 
  • 1996 ते 2001 उपाध्यक्ष 
  • 2005 ते 2011 अध्यक्ष 
  • 2011 ते 2016 संचालक 
  • भीमा सहकारी साखर कारखान्याचे 15 वर्षे संचालक 

साखर कारखान्याचे स्वप्न अधुरे 
तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर उसाचे क्षेत्र असून गाळपासाठी शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती. शेतकरी सुखावला पाहिजे यासाठी सहकार क्षेत्राबरोबर खासगी तत्त्वावर कारखाना काढण्याचे त्यांचे प्रयत्न होते. परंतु, त्यांचे स्वप्न अधुरे राहिले, याची त्यांना खंत जाणवत होती. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com