esakal | सोलापूर "झेडपी'चे उपाध्यक्ष चव्हाण म्हणतात, कोरोनासाठी द्या वाढीव नऊ कोटी 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर "झेडपी'चे उपाध्यक्ष चव्हाण म्हणतात, कोरोनासाठी द्या वाढीव नऊ कोटी 

साथरोग नियंत्रणासाठी द्या एक कोटी 
जिल्ह्यात अनेक तालुक्‍यांमध्ये महापुराचे संकट ओढवले होते. त्यामुळे त्या भागात साथरोग येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राला साथरोगाच्या औषधोपचारासाठी 45 लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, सध्याच्या काळात ती तरतूद पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे त्यासाठी वाढीव एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी अध्यक्ष कांबळे यांच्याकडे केली आहे. 

सोलापूर "झेडपी'चे उपाध्यक्ष चव्हाण म्हणतात, कोरोनासाठी द्या वाढीव नऊ कोटी 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याच्या उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आणखी नऊ कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 30 हजाराच्या उंबरठ्यावर गेली आहे. ग्रामीणमध्ये दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्या पार्श्‍वभूमिवर निधीची कमतरता पडू नये, यासाठी वाढीव निधीची मागणी श्री. चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आरोग्य विभागासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामधून तातडीच्या उपाययोजना म्हणून एक कोटी रुपयांचा निधी कोरोनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. त्यामुळे वाढीव चार कोटी रुपयांची तरतूद कोरोनासाठी करावी, असे पत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना दिले आहे. शासनाने आरोग्य विभागाच्या निधीमध्ये कपात करु नये, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याला श्री. चव्हाण यांनी शिफारस केली आहे. जिल्हा नियोजन समितीने आरोग्य विभागासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, ती रक्कम या काळात पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे त्यामध्ये पाच कोटींची वाढ करुन ती रक्कम सात कोटी करण्याची मागणी उपाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. 

मागणीला काय उत्तर मिळते याबाबत उत्सुकता 
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी कोरोनाच्या काळात जिल्हा परिषद सेस फंड व जिल्हा नियोजन समितीकडून वाढीव नऊ कोटी रुपयांची मागणी केली आहे. उपाध्यक्ष चव्हाण यांच्या मागणीला अध्यक्ष कांबळे व जिल्हाधिकारी शंभरकर नेमके काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.