मुख्यमंत्री शिवसेनेचा पण रुबाब राष्ट्रवादीचाच ! शिवसेना व युवासेनाप्रमुखांना मिळेना वेळ; पदाधिकाऱ्यांना येईना सत्तेचा फिल 

0images_1540644300035_ajit_pawar_and_udav.jpg
0images_1540644300035_ajit_pawar_and_udav.jpg

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे असून पर्यावरण मंत्री म्हणून युवासेनेचे आदित्य ठाकरे हे काम पाहत आहेत. दोघेही मंत्री असल्याने त्यांना मुंबई सोडून राज्यभर दौरे करणे मुश्‍किल होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गराडा असतो आणि त्या गर्दीत शिवसेनेचा पदाधिकारी दिसेनासा झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांची कामे होत नसल्याने त्यांना सत्तेचा फिल येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रभारी संपर्कप्रमुख तथा संपर्कमंत्री नकोच 
तानाजी सावंत यांना सोलापूरचे संपर्कप्रमुख केल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून मतभेद निर्माण झाले आणि त्यांच्याविरोधात नाराजी वाढली. पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि त्यातच मोहोळ, करमाळा, शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. दुसरीकडे त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा असताना तेही मिळाले नाही. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सोलापूरकडे पाठ फिरवली, अशी चर्चा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने मंत्री शंकरराव गडाख यांना संपर्कमंत्री केले, परंतु काही कारणास्तव पुन्हा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे संपर्कमंत्रीपद सोपविण्यात आले. मात्र, त्यांनाही त्यांचा मतदारसंघ सोडून लक्ष देणे जमत नसल्याने आता सोलापूरसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख नियुक्‍त करावा, तोही सोलापूरचा असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सध्या सोलापूर शहर-जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिलेला नाही. माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, माजी आमदार शिवशरण पाटील, रतिकांत पाटील असे अनेक जुने शिवसैनिक पक्षापासून दुरावत असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत कोलांटउडी घेतलेले नेतेमंडळीही पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय नाहीत. आता कोरोनाचे कारण पुढे करुन ते वेळ मारुन नेत असल्याचीही चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा ठाकरे कुटुंबातील सदस्याला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळाले तर दुसऱ्या सदस्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. या पार्श्‍वभूमीवर सुरवातीला राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, अतिवृष्टीच्या नुकसानीचा पाहणी दौरा वगळता मुख्यमंत्री किंवा युवासेनाप्रमुख सोलापूर दौऱ्यावर आलेले नाहीत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले संपर्कप्रमुख तानाजी सावंत हेदेखील पक्षाच्या संघटनात्मक बांधणी अथवा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी आलेले नाहीत. दुसरीकडे मात्र, पालकमंत्री सातत्याने सोलापूर दौरा करीत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधण्यात ते यशस्वी ठरू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना भेटणे कठीण होऊ लागल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com