श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, की कोरोनाला हरवण्यासाठी धारावीकरांनी टाकलेलं हे शेवटचं पाऊल आहे. येथील झोपडपट्टीत राहणारे लोक फारसे शिकलेले नसले तरी त्यांनी पालिकेने राबवलेल्या "माझी कुटुंब - माझी जबाबदारी'मध्ये सहभागी होत कोरोनाच्या सर्व नियमांचे कोटेकोरपणे पालन करून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. येथील कोरोनामुक्त पॅटर्नची साऱ्या जगाने आता दखल घेतली आहे.
पंढरपूर (सोलापूर) : आशिया खंडातील सर्वांत मोठी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या "माझं कुटुंब - माझी जबाबदारी' या आवाहनाला प्रतिसाद देत कोरानाला हरवण्याचं काम केले आहे. याची जगाने देखल घेतली आहे. मुख्यमंत्री बोलत नाहीत तर त्यांनी धारावीकरांच्या मदतीने करून दाखवलं आहे, असा उपरोधिक टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी येथे लगावला.
महापौर श्रीमती पेडणेकर शुक्रवारी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या. मुखदर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी धारावीकरांच्या कोरोनामुक्तीचे कौतुक करत, हे यश राज्य शासन आणि महापालिकेतील अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे असल्याचेही स्पष्ट केले.
श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, की कोरोनाला हरवण्यासाठी धारावीकरांनी टाकलेलं हे शेवटचं पाऊल आहे. येथील झोपडपट्टीत राहणारे लोक फारसे शिकलेले नसले तरी त्यांनी पालिकेने राबवलेल्या "माझी कुटुंब - माझी जबाबदारी'मध्ये सहभागी होत कोरोनाच्या सर्व नियमांचे कोटेकोरपणे पालन करून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. येथील कोरोनामुक्त पॅटर्नची साऱ्या जगाने आता दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईबरोबरच महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेली टीका देखील या निमित्ताने निरर्थक ठरली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर कितीही टीका केली तरी ते त्यांना महत्त्व देत नाहीत. राज्य हे माझं कुटुंब आहे, त्याप्रमाणे त्यांनी या निमित्ताने करून दाखवले आहे. पूर्ण जग, माझा देश, महाराष्ट्र आणि मुंबई कोरोनामुक्त व्हावी, असं आपण विठ्ठलचरणी साकडं घातल्याचेही श्रीमती पेडणेकर यांनी सांगितले.
महापौरांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका विठूचरणी
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद ऊर्फ मेघनाथ यांचा 10 जानेवारी रोजी विवाह आहे. त्यांच्या विवाहाची लग्नपत्रिका श्रीमती पेडणेकर यांनी विठ्ठलचरणी ठेवून विठुरायाला लग्नाचे निमंत्रण दिले. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे त्यांनी लग्नपत्रिका सुपूर्त केली. या वेळी मंदिर समितीच्या वतीने महापौर पेडणेकर यांचा साडी- चोळी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल