ऍपच्या माध्यमातून सुरु आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांची किलबिल 

संतोष सिरसट 
Friday, 4 September 2020

विद्यार्थ्यांना दिले जाते प्रमाणपत्र 
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी घाडगे यांनी स्टिकर ले या ऍपचा वापर करून विविध स्टिकर बनवले आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शाबासकी देण्यासाठी केला जातो. एक आठवड्याचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे. 

सोलापूर ः ऑनलाइन शिक्षणाच्या जमान्यात ऍन्ड्रॉइड मोबाईलला खूप महत्व आले आहे. त्या मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ऍप डाऊनलोड करुन अरण (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कल्पना घाडगे या पहिलीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांची किलबिल सुरु आहे पण ती प्रत्यक्षात शाळेत नसून मोबाईलच्या माध्यमातून तयार केलेल्या व्हॉटसऍप ग्रुपवर. 

यंदाच्या वर्षी मुलांची शाळा सुरू होण्याआधीच कोरोनामुळे घरूनच शिक्षण सुरु करावे लागले. जे विद्यार्थी आणखी शाळेतच आले नव्हते, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवातच ऑनलाईन शिक्षणाने झाली हे तंत्रज्ञानाचे यश आहे. घाडगे यांनी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप बनवला. या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून अभ्यासाची बैठक तयार करणे यासाठी मुलांना आवडतील अशा छोट्या छोट्या कृती घेऊन त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. त्यत्त कागद फाडणे, त्याचे छोटे-छोटे तुकडे करणे, त्यापासून चेंडू बनवणे, छोटे छोटे अक्षराचे आकार काढणे, गणनपूर्व क्रियांची तयारी करून घेणे अशा रीतीने शिक्षणास सुरुवात केली. या सर्व कृती कशा करायच्या याची सविस्तर माहिती त्यांनी ग्रुपवर दिली. घाडगे यांनी मुलांना विविध व्हिडिओ दाखवण्यासाठी ते यू ट्यूबवरून डाऊनलोड करून घेतले. शिक्षणासंदर्भात असलेल्या फेसबुक पेजेस वरून मुलांना उपयोगी पडेल अशी सामग्री मोबाइलमध्ये जतन करून ठेवली. 

गणनपूर्व क्रियांमध्ये पालकांना चार ते पाच दिवस अगोदर कोणत्या क्रियेचा व्हिडिओ बनवायचा याविषयी माहिती सांगून व्हिडिओ बनवून घेतला जातो. दररोज एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ ग्रुपवर पाठवून त्याप्रमाणे इतर सर्व विद्यार्थ्यांकडून पालकांना कृती करून घेण्यास सांगितले जाते. पिक्‍स आर्ट या ऍपमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी अक्षरकार्ड, शब्दकार्ड गणितासाठी उदाहरण कार्ड बनविली. याचा उपयोग करून विद्यार्थी त्यांचा अभ्यास करतात व केलेल्या अभ्यासाचे फोटो पाठवतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The chirping of the first students has started through the app