
साहेब, निवडणुका झाल्या, सरपंच निवडी झाल्या. निवडणूक कार्यक्रम संपल्याने आत्ता तरी अवैध वाळू तस्करीकडे लक्ष द्या. तालुक्यात अवैध वाळू उपशाचा उद्योग राजरोसपणे सुरू असून दिवसेंदिवस वाळू चोरांची मुजोरी वाढत असल्याने याकडे नूतन तहसीलदारांनी अधिक लक्ष द्यावे, असे नागरिकांना वाटत आहे.
सांगोला (सोलापूर) : "साहेब, निवडणुका झाल्या, सरपंच निवडी झाल्या. निवडणूक कार्यक्रमात तुम्ही खूप बिझी होता. निवडणुका संपल्याने आत्ता तरी अवैध वाळू तस्करीकडे लक्ष द्या. वाळू माफियांच्या मुसक्या आवळा !' तालुक्यात अवैध वाळू उपशाचा उद्योग राजरोसपणे सुरू असून दिवसेंदिवस वाळू चोरांची मुजोरी वाढत असल्याने याकडे नूतन तहसीलदारांनी अधिक लक्ष द्यावे, असे नागरिकांना वाटत आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत वाळू चोरांची मुजोरी वाढल्यामुळे शांतताप्रिय तालुक्याला हे लाजिरवाणे झाले आहे.
सांगोला तालुका हा सर्वच बाबतीत शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. राजकीय क्षेत्राबरोबरच इतर सामाजिक क्षेत्रांमध्ये सर्वजण एकत्रित येत असतात. त्यामुळे तालुका शांततेच्या बाबतीत नंदनवन समजला जातो. तालुक्यातून माण, अप्रुका, बिलनण, कोरडा अशा नद्या जातात. या नद्यांच्या पात्रांतून "काळ्या सोन्या'ने अनेकांची इच्छापूर्ती होत आहे. अल्प कालावधी व कमी श्रमात कोट्यवधींची माया गोळा करण्याचा व्यवसाय म्हणून वाळू व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र याचा उलट परिणाम निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून युवा पिढीही गैरमार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा झालेला शिरकाव प्रशासनासह सामान्य नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. सुरवातीला "अर्थ'पूर्ण संबंधातून केलेली डोळेझाक आता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगलट येत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. नुकतीच वाळू उपशावर कारवाई करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला धरून त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच या अगोदरही जप्त केलेली वाळूची वाहने एसटी डेपोतून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाळू तस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन मात्र गप्प का दिसत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील विविध नदीपात्रातून व ओढ्यातून अवैधरीत्या वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. नदीपात्रात निर्माण झालेले खोल खड्डे वाळू माफियांचे कर्तृत्व दाखवून देते. वाळू माफियांची वाळू काढण्यापासून ज्या ठिकाणी हवे आहे त्या ठिकाणापर्यंत पोच करण्याचे एक मोठे रॅकेटच दिसून येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती असूनही प्रशासन मात्र किरकोळ कारवाईचा बडगा उचलून याकडे डोळेझाक करीत आहे. शांतताप्रिय तालुक्याला वाळू तस्करीमुळे वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी व पुढाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ठोस कारवाईचे संकेत दिले पाहिजे.
अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज
सध्या वाळू तस्करीमुळे तालुक्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. अधिकाऱ्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा वाढत्या घटनांमुळे अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, अशा वाळू तस्करांना पाठीशी न घालता वेळीच कठोर कारवाई केली पाहिजे. अशा कारवाईमुळे पुढील होणाऱ्या मोठ्या घटना टाळल्या जातील व तालुक्याची शांतता कायमच अबाधित राहील, असे सामान्य नागरिकांना वाटते.
वाळू तस्करांच्या दादागिरीने प्रशासन चिंतेत
महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळूच्या वाहनांवर जप्तीची दंडात्मक कारवाई केली जाते. तरीदेखील अवैधरीत्या होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घातला जात नाही. वाळू तस्करांकडून ठेवण्यात आलेल्या लोकांकडून कारवाई टाळण्यासाठी थेट अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. इतकेच नव्हे तर त्यांचा पाठलागही करण्यात येतो. काही वेळेस शेवटच्या क्षणी अधिकाऱ्याला दमदाटी व त्यांच्यावर हल्लेही होत आहेत. वाळू तस्करांची ही वाढती दादागिरी प्रशासनाची मात्र चिंता वाढवणारी आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
महाराष्ट्र