सैन्याप्रमाणे काटेकोर कारभारासाठी धोत्रेकरांनी दिले माजी सैनिकांच्या ताब्यात ग्रामपंचायत ! 

प्रशांत काळे 
Thursday, 7 January 2021

धोत्रे (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी देशासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोठेही अन्‌ कधीही ग्रामपंचायतीची सत्ता बिनविरोध करून माजी सैनिकांच्या हातात दिलेली ऐकिवात नाही; मात्र बार्शी तालुक्‍याने हे दाखवून दिले आहे.

बार्शी (सोलापूर) : धोत्रे (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी देशासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोठेही अन्‌ कधीही ग्रामपंचायतीची सत्ता बिनविरोध करून माजी सैनिकांच्या हातात दिलेली ऐकिवात नाही; मात्र बार्शी तालुक्‍याने हे दाखवून दिले आहे. सैन्यातील प्रशासनाप्रमाणे काटेकोर कारभार करावा, 15 लाख रुपयांचा आमदार निधी पहिल्यांदाच तुम्हाला दिला जाईल, असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धोत्रे ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध आलेल्या सचिन डांगे, शालन घोडके, नंदा सुरवसे, सुमंत जाधवर, गणेश मोरे, उल्लतब्बी शेख, वंदना जाधवर, मंगल जाधवर, बुवासाहेब बोकेफोडे या नऊ माजी सैनिकांच्या सत्काराप्रसंगी आमदार राऊत बोलत होते. 

जेथे महिला आरक्षण आहे तिथे माजी सैनिकांच्या पत्नीला संधी दिली असून, सर्व पक्षांच्या हितचिंतकांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. खामगाव, धोत्रे, कुसळंब, धानोरे ही बंद पडलेली पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यन्वित करू. साठवण तलाव, जामगाव - धोत्रे रस्ता पूर्ण केला जाईल, असे आश्वासनही आमदार राऊत यांनी नूतन सदस्यांना दिले. 
प्रास्ताविक करताना ग्रामस्थ हमीद पठाण म्हणाले, की 1956 मध्ये धोत्रे ग्रामपंचायत स्थापन झाली. बारा निवडणुका झाल्या. गावातील तंटे संपले पाहिजेत, त्याशिवाय गावात सुखाने लक्ष्मी नांदत नाही. यासाठी जय जवान - जय किसान पॅनेलची स्थापना केली. गावात 33 माजी सैनिक असून 35 जण सध्या लष्करामध्ये कार्यरत आहेत. 68 जण देशाची सेवा केल्याचा ग्रामस्थांना अभिमान आहे. त्यामुळे गावाची सेवा करण्याची संधी त्यांच्या हातात दिली आहे. 

नूतन सदस्य माजी सैनिक सुमंत जाधवर म्हणाले की, ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाला तडा जाणार नाही. गाव डिजिटल करायचे आहे पण मोबाईल रेंज नाही. टॉवर उभा करण्याचा प्रथम प्रयत्न करणार. आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालय, पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Dhotre handed over Gram Panchayat to ex servicemen