esakal | शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यासाठी मंगळवेढेकरांची सह्यांची मोहीम ! 

बोलून बातमी शोधा

Shivaji Maharaj}

शहरातील मुख्य चौक असलेल्या शिवप्रेमी चौकात मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी सह्यांची मोहीम राबविली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी यावर सह्या केल्या. 

शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यासाठी मंगळवेढेकरांची सह्यांची मोहीम ! 
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : शहरातील मुख्य चौक असलेल्या शिवप्रेमी चौकात मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी सह्यांची मोहीम राबविली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी यावर सह्या केल्या. 

गेल्या 25 वर्षांपासून शहरातील नागरिकांची शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, यासाठी मागणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंगळवेढा किल्ला व परिसरामध्ये 1665 च्या डिसेंबर महिन्यात जवळपास पंचवीस दिवस वास्तव्य होते. त्यांचा पदस्पर्श शहर व तालुक्‍यासाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. हा इतिहास भविष्यातील तरुण पिढीला प्रेरणादायी व्हावा या उद्देशातून नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, अशी मागणी केली आहे. 

नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अश्वारूढ पुतळा उभा करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु चार वर्षांत अद्याप याबाबत हालचाली गतिमान झाल्या नसल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असतानाच, चार दिवसांपूर्वी मंगळवेढा येथे आलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एका बाजूला उभा न करता मध्यवर्ती उभा करावा, अशी मागणी करण्यात आली. शहरातील नागरिकांनी याबाबत सह्यांची मोहीम उघडली असून, त्याला मंगळवेढेकरांचा चांगला सहभाग मिळत आहे. 

राज्य शासनाच्या पुतळा बसविण्याबाबतच्या अध्यादेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत नगरपालिकेने ठराव केला आहे. पुतळ्याच्या संदर्भात डिझाईन तयार करण्याच्या सूचना आर्किटेकला दिलेल्या आहेत. त्यांचे डिझाइन प्राप्त होताच त्याबाबतच्या हालचाली गतिमान करण्यात येतील. जागेबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या भेटी घेऊन योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. शेवटी जागेपेक्षा पुतळा बसविणे महत्त्वाचे आहे. 
- अजित जगताप, 
पक्षनेते, मंगळवेढा नगरपालिका 

रस्त्याच्या मध्यवर्ती मुख्य चौकात पुतळा उभारल्यास नव्या तरुणाईसाठी शिवरायांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवादी ठरेल. आज मितीला रस्त्याची रुंदी कमी असली तरी भविष्यात मास्टरप्लॅन झाल्यास रस्ता खूप मोठा होणार आहे. 
- ज्ञानेश्वर कौडूभैरी, 
अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती मंडळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल