पंढरपुरातील महापूर ओसरतोय; तपासणीनंतर सुरू होणार पुलांवरून वाहतूक 

अभय जोशी 
Saturday, 17 October 2020

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहराच्या अनेक भागांत शिरलेले पाणी रात्रीतून कमी झाले. आज सकाळी नदीचे पाणी घाटापर्यंत कमी झाले होते. पूर ओसरल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. नागरिकांनी आणि नगरपालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. सर्व पुलांवरील पाणी कमी झाल्याने तपासणी करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहराच्या अनेक भागांत शिरलेले पाणी रात्रीतून कमी झाले. आज सकाळी नदीचे पाणी घाटापर्यंत कमी झाले होते. पूर ओसरल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. नागरिकांनी आणि नगरपालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. सर्व पुलांवरील पाणी कमी झाल्याने तपासणी करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. 

काल (शुक्रवारी) दुपारी 11 पर्यंत भीमा नदीची पाण्याची पातळी वाढतच होती. अकरा वाजता पंढरपूर येथे नदीचा विर्सग 2 लाख 91 हजार क्‍युसेक इतका वाढला होता. त्यामुळे आणखी किती पाणी वाढणार या विचाराने पूरग्रस्त भागातील नागरिक आणि व्यापारी हवालदिल झाले होते. यापूर्वी जेव्हा जेव्हा भीमा नदीला पूर आला होता तेव्हा धरणातून किती पाणी सोडल्यावर पंढरपूर शहरात कोणकोणत्या भागात किती पाणी येते याच्या नोंदी जलसंपदा विभागाने केलेल्या आहेत. त्यावरून संबंधित विभागाचे अधिकारी या वेळी कुठंपर्यंत पाणी येईल, किती वेळ राहील या विषयाचा अंदाज व्यक्त करत होते; परंतु दोन - तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याशिवाय ठिकठिकाणच्या ओढ्या- नाल्याचे पाणी देखील नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मिसळत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून पूर्वीच्या नोंदीवरून केला जाणारा अंदाज या वेळी काही प्रमाणात चुकला. अनेक भागांत अपेक्षेपेक्षा तीन ते चार फूट पाणी जास्त आले. 

दरम्यान, काल उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले. त्यामुळे पंढरपूर येथील पाण्याचा विसर्ग काल सायंकाळपासून कमी होऊ लागला होता. काल सायंकाळी पंढरपूर येथे पाण्याचा विसर्ग 2 लाख 87 हजार क्‍युसेक इतका होता. रात्रीतून पाण्याची पातळी वेगाने कमी झाली. आज सकाळी शहराच्या अनेक भागात शिरलेले पुराचे पाणी कमी कमी होत नदीच्या घाटांपर्यत कमी झाले होते. आज सकाळी सात वाजता पंढरपूर येथील विसर्ग कमी होऊन 2 लाख 13 हजार 229 इतका झाला होता. 

शहरातील सर्व पुलांवरील पाणी कमी झाले असून पुलांची तपासणी झाल्यानंतर या पुलांवरील वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

पूर कमी होताच नगरपालिकेने आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. नगरपालिकेच्या सफाई कामगार वसाहतीत देखील पुराचे पाणी आले होते परंतु तरी देखील सफाई कामगार आज शहर स्वच्छतेच्या कामावर तातडीने आले आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens were relieved as the flood waters in Pandharpur were receding