
शिक्षणाधिकारी म्हणाले...
सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. 27 जानेवारीपासून शाळा सुरु होणार असून प्रजासत्ताक दिनी कोणत्याही विद्यार्थ्यांना बोलावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वर्ग भरणार असून इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांनाच प्राधान्य द्यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.
शिक्षणाधिकारी म्हणाले...
राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 22 हजार 204 शाळा असून त्यामध्ये 56 लाख 48 हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. 23 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 21 हजार 287 शाळा सुरु झाल्या असून 22 लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. राज्यभरात पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख सहा हजार 491 शाळा असून 78 लाख 47 हजार विद्यार्थी पाचवी ते आठवीत शिकत आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शाळेतील प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दररोज तीन तासापर्यंतच अध्यापन करावे आणि दुपारी दोननंतर शाळेत कोणत्याही मुलास थांबवून ठेवू नये, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत. दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती दिसून न आल्यास शाळेची वेळ सकाळी नऊ किंवा दहा ते दुपारी बारा किंवा एकपर्यंत करण्याचा विचार केला जाईल. शालेय शिक्षण विभागाकडून त्यासंबंधी मार्गदर्शन मागविले जाईल, असेही शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.