"पदवीधर'साठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनचे उमेदवार जाहीर, औरंगाबादमधून ढवळे, पुण्यातून शेख, नागपूरमधून सोमकुवर 

प्रमोद बोडके
Tuesday, 10 November 2020

औरंगाबाद, पुणे, नागपूर या तिन्हीही पदवीधर मतदारसंघात इंग्लिश स्कूल टीचर असोसिएशनने कोचिंग क्‍लासेस असोसिएशनला पाठिंबा दिला आहे. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता क्‍लासेसच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून राज्याची तसेच देशाची बेरोजगारी कमी करण्याचे काम देशभरातील पदवीधारकांनी केले आहे. त्यांच्याच प्रश्‍नाकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत नसल्याने महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघातील जागा लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेसने घेतला आहे. 
- प्रा. असिफ शेख, उमेदवार, पुणे पदवीधर 

सोलापूर : खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेस असोसिएशनने घेतला आहे. असोशियनचे राज्य कार्याध्यक्ष सचिन ढवळे यांना औरंगाबादमधून, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आसिफ शेख यांना पुण्यातून तर पूर्व विदर्भाचे अध्यक्ष प्रदीपकुमार सोमकुवर यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर (सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार एका वर्गात, एका बाकावर, एक विद्यार्थी याप्रमाणे) शिकवणी घेण्याची परवानगी द्यावी, कोचिंग क्‍लासेस व्यवसायिकांना लॉकडाऊनपासून ते क्‍लासेस पूर्ववत होईपर्यंत क्‍लासेस संचालकांना प्रतिमाह चाळीस हजार रुपये व खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना प्रतिमा 20 हजार रुपये मानधन द्यावे, कोचिंग क्‍लासेस चालकांना त्यांच्या जागा मालकांनी भाडे माफ करावे यासाठी शासनाने त्वरित अध्यादेश काढावा, क्‍लासेस क्षेत्राचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये समावेश करावा, कोचिंग क्‍लासेस व्यवसायिकांना मुद्रा लोन द्यावे, कोचिंग क्‍लासेसची एक वर्षाची जीएसटी, व्यवसायकर कर, लाईट बिल, स्थानिक कर माफ करावा यासह इतर प्रमुख प्रश्‍नांवर असोशियन काम करत आहे.

या निवडणुकीत असोशियन पूर्ण तयारीने उतरले असल्याची माहिती राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर, राज्य उपाध्यक्ष प्रा. पी. एम. वाघ, राज्य सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, महिला ब्रिगेडच्या प्रा. वैशाली डक, राज्य संघटक प्रा. प्रशांत ढाकणे, राज्य प्रवक्ता प्रा. शिवाजी पाटील, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. सचिन ढवळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coaching Classes Association announces candidates for 'Graduate', Dhawale from Aurangabad, Sheikh from Pune, Somkumar from Nagpur