ग्रामपंचायत निवडणुकीत विधानसभा पोटनिवडणुकीची रंगीत तालीम ! नेते-कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय 

हुकूम मुलाणी 
Monday, 4 January 2021

भालके व परिचारक या दोन्ही गटांबरोबरच दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचाही गट स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर दामाजी कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी - विक्री संघ या अनेक संस्थांवर तसेच पंढरपूर- मंगळवेढा तालुक्‍यामध्ये प्रबळ आहे. शिवाय शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे या देखील जनतेशी संपर्कात आहेत. 

मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीमच सुरू झाली आहे. 

कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या या मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रिडालोसमधून आमदार झालेले आमदार भारत भालके यांनी तीन निवडणुका वेगवेगळ्या पक्षांतून लढवल्यामुळे हा मतदारसंघ पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित मानला जाऊ लागला आणि लोकांच्या मनातील हीच नस ओळखून आमदार भालके यांनी स्वतःला व पक्षाला महत्त्व न देता "जनता हाच माझा पक्ष' ही भूमिका समोर ठेवून लोकांशी समरस होत राहिले. 

परंतु, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या त्यांच्या अकाली निधनामुळे भलके गटात मोठी पोकळी निर्माण झाली. तशीच पोकळी आमदार परिचारक गटात देखील निर्माण झाली. या परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाल्यामुळे या गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याने दोन्ही गटांत वडीलधारी नेतृत्व हरपले. पर्यायाने या परिचारक गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर तर भालके गटाची जबाबदारी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व व्यंकट भालके यांच्यावर पडली. त्यामुळे दोन्ही गटांबरोबर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचाही गट स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर दामाजी कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी - विक्री संघ या अनेक संस्थांवर तसेच पंढरपूर- मंगळवेढा तालुक्‍यामध्ये प्रबळ आहे. शिवाय शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे या देखील जनतेशी संपर्कात आहेत. 

नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना या नेत्यांना कोरोनाच्या संकटात कसरत करावी लागत असली तरी देखील सध्या सुरू असलेली लग्नसराई, कार्यकर्त्यांच्या नवीन व्यवसायांची उद्‌घाटने, मतदारसंघातील जनतेतील सुख- दुःखातही भेटी देऊन त्यांच्यात समरस होत आहेत. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यात येत आहेत. सोशल मीडियाचा तिन्ही गटांकडून तितकाच वापर केला जात आहे. त्यामुळे माहोल जरी पोटनिवडणुकीचा नसला तरी कार्यकर्ते मात्र निवडणुकीआधीच आपल्या नेत्यांना ऍक्‍टिव्ह ठेवण्यात गुंतले आहेत. 

त्यातच सध्या 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही समावेश आहे. त्यामुळे यापुढील काळातील तीन महिने राजकीय उलथापालथीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच दोन्ही मतदारसंघांतील मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका व सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीयामुळे हिवाळ्यातील कडक थंडीबरोबर निवडणुकीचे गरम वातावरण थंडी नेत्यांसह कार्यकर्त्यांना जाणवू लागल्यामुळे ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न समजून घेत असल्यामुळे जनतेला कोरोनाच्या संकटातही सुखावह वाटू लागले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The colorful rehearsal for the Gram Panchayat elections and the Assembly by elections is starting in Mangalwedha