#Coronavirus : जरा विचार करा, पोलिसही माणूसच आहे की.!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांवर ताण दिसून येत आहे. एरव्ही जयंती, मिरवणूक, उत्सवांचा बंदोबस्त असतोच, मात्र आता कोरोनामुळे साऱ्यांना घरात बसवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर थांबावे लागत आहे.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली आहे. स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी घरातच राहा असे सांगण्यात येत आहे. अशा काळातही पोलिस कर्मचारी आणि अधिकारी मात्र रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या जिवाची काळजी न पोलिस ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष आहेत. पोलिस स्वत:ची काळजी घेत असले तरी कुटुंबीयांना मात्र भीती वाटत आहे. पोलिसही माणूसच आहे की.. अशी भावना पोलिस कुटूंबीयांमधून व्यक्त होत आहे. 

कोरोना : सोलापूर जिल्ह्यात नो सायकल, नो व्हेईकल -

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांवर ताण दिसून येत आहे. एरव्ही जयंती, मिरवणूक, उत्सवांचा बंदोबस्त असतोच, मात्र आता कोरोनामुळे साऱ्यांना घरात बसवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. या काळात पोलिस कुटुंबीयांच्या नेमक्‍या काय भावना आहे हे "सकाळ'ने जाणून घेतले. जनतेने स्वत:साठी आणि इतरांसाठी घरातच राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलिस कुटुंबीयांनी केले आहे. 

कोरोना : सोलापुरातील या अपार्टमेंटच्या रहिवाशांनी केला लॉकडाऊन! 

या आहेत पोलिस कुटुंबीयांच्या भावना...

माझे पती व माझे सासरे हे दोघेही पोलिस खात्यात आहेत. कुटुंबाचा आणि स्वतःचा विचार न करता ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ड्यूटीवर गेल्यानंतर ते आजारी तर पडणार नाहीत ना याची काळजी वाटत आहे. घरी आल्यानंतर साधे शिंकले किंवा खोकला आला तरी भीती वाटते. ड्यूटीवरुन घरी आल्यानंतर दोघेही घराच्या बाहेरच स्वतःचे कपडे धुऊन टाकतात व अंघोळ करून घरात येतात. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पती आणि सासरे घरात कोणासोबत मिक्‍स होत नाहीत. लोकांसाठी आपला जीव धोक्‍यात घालणाऱ्या पोलिसांची काळजी कोण घेणार? जनतेला एकच सांगावेसे वाटते की जी व्यक्ती स्वतःच्या जिवाचा व कुटुंबाचा विचार न करता रस्त्यावर उभी राहते किमान त्याचा तरी आदर करून आपण सहकार्य करावे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. 
- जयश्री गावसाने, 
पोलिस कुटुंबीय 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करायला हवे. सूचना देऊनही लोक ऐकत नाहीत म्हणून अशा काळातही पोलिसांवर ताण पडतो आहे. कोरोनामुळे ड्यूटीवरून आल्यानंतर पतीला आधी सॅनिटायझरने हात धुवायला सांगते. लगेच घरात येऊ देत नाही. पोलिस म्हणून दिवसभरात वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा संपर्क येतो, त्यामुळे भीती वाटते. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने दिलेली आदर्श आचारसंहिता आम्ही पाळतो. नागरिकांनीही पाळायला हवे. स्वच्छता ठेवावी. एकत्र येणे टाळा. आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडावे. स्वतःला, कुटुंबाला आणि पर्यायाने देशाला सुरक्षित ठेवावे. 
- नूतन पाटील, 
पोलिस कुटुंबीय 

संचारबंदी करूनही अनेक सुशिक्षित लोक सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. घराबाहेर पडू नका असे सांगूनही लोक रस्त्यावर येत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वांनी घरातच राहणे योग्य आहे. अशा काळातही पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. पोलिसही माणूस आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा. ड्यूटीवरून घरी आल्यानंतर मी लगेच त्यांना हात, पाय धुवायला सांगते. पोलिस कुटुंबीय म्हणून आम्हालाही विशेष काळजी घ्यावी लागत आहे. सर्वांनी कायद्याने पालन करायला हवे. 
- ज्योती पावले, 
पोलिस कुटुंबीय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communication with police families about Coronavirus