"नागरिक व शेतकरी बांधवांनो, धोक्‍याच्या वीज यंत्रणेबाबत द्या व्हॉटस्‌ऍपद्वारे माहिती !' 

संतोष सिरसट 
Thursday, 14 January 2021

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईल व्हॉट्‌सऍपद्वारे देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

उत्तर सोलापूर : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईल व्हॉट्‌सऍपद्वारे देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉट्‌सऍपद्वारे एकूण 39 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वच तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले आहे. 

दरम्यान, ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने सध्या ऊस तोडणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीज तारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी उसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी वीजयंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉट्‌सऍपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यासाठी 7875440455 हा व्हॉट्‌सऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती/तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्‌सऍपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्‌सऍप नाहीत त्यांनी एसएमएसद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोल किंवा जमिनीवर लोंबळकत आहे, फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे, रोहित्रांचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरूपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्‌सऍपच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरू असलेली ही सेवा उपलब्ध आहे. 

व्हॉट्‌सऍपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉट्‌सऍपवरच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद देण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints about dangerous power systems can now be made through WhatsApp