कोव्हिड चाचण्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम ! पुढील उपचाराची दिशा ठरवताना उडतोय गोंधळ 

अशोक पवार 
Monday, 1 March 2021

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांमधून आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनंतरही चाचणी अहवाल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

वेळापूर (सोलापूर) : कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नागरिकांना लक्षणे दिसू लागताच कोव्हिड चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सकारात्मक चित्र असताना मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांमधून आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनंतरही चाचणी अहवाल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोमवारी (ता. 22) रोजी रुग्णांच्या घेतलेल्या स्वॅबचे आरटीपीसीआर अहवाल सहा दिवसांनंतर रविवार (ता. 28) पर्यंत प्राप्त झालेले नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील चाचणीसाठी घेतलेले नमुने सोलापूर स्थित डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडे संकलित केले जातात. या प्रयोगशाळेतूनच संशयितांचे चाचणी अहवाल उशिरा येत असल्याने संबंधित रुग्ण आणि कुटुंबीयांमध्ये निदान न झाल्याने उपचाराची कोणतीही दिशा ठरविण्याबाबत गोंधळ उडत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा कोरोना लाट थोपविण्यासाठी गंभीर आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांतून विचारला जात आहे. 

खासगी प्रयोगशाळांमधून आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल मात्र एक किंवा दोन दिवसांतच प्राप्त होत असताना गरीब, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये मात्र शासकीय आरोग्य यंत्रणेच्या या विलंबामुळे द्विधा आणि भीतीची मानसिकता तयार होत आहे. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी संशयितांचे चाचणीसाठी घेतलेले स्वॅब विनाविलंब संकलित करणारी आणि प्रयोगशाळेत तपासणी किमान वेळेत पूर्ण करणारी यंत्रणा सदृढ करणे अत्यावश्‍यक बनले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns are growing among citizens as reports of covid tests are coming in late