मोहोळ येथील पोलिस वसाहत व ठाणे अडकले लालफितीत ! कर्मचाऱ्यांचे मात्र मानसिक खच्चीकरण 

Mohol Police Colony
Mohol Police Colony

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील पोलिस वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली असून, मोहोळ पोलिसांवर "आम्हाला घर देता का घर !' असे म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रश्नाकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मोहोळ लोकप्रतिनिधींचे मात्र याकडे साफ दुर्लक्षच आहे. या सर्व अडचणींमुळे ज्यांच्यावर समाजासह लोकप्रतिनिधींच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, अशा पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. नूतन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या आपल्या सहकाऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावतील काय? अशी विचारणा होत आहे. 

मोहोळ तालुका तसा राज्याच्या नकाशावरचा. मोहोळ हे सोलापूर- पुणे, पंढरपूर -सोलापूर या मुख्य मार्गावरील केंद्रबिंदू आहे. अनेक अपघात व अप्रिय घटना या परिसरात घडतात. मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातो. त्यामुळे गुन्हेगाराला गुन्हा करून पळून जाण्यास पोषक वातावरण आहे. सध्या पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे किमान 70 टक्के पोलिस कर्मचारी हे पोलिस वसाहत नसल्याने सोलापूर व अन्य ठिकाणाहून येऊन - जाऊन काम करतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानीसह शारीरिक श्रमही मोठ्या प्रमाणात होतात. 

नवीन पोलिस वसाहत निर्मितीसाठी पोलिस विभागाने 2018 मध्ये वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वसाहत इमारतीची पाहणी करून ही इमारत राहण्यायोग्य नाही, असा अहवालही वरिष्ठांना सादर केला आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात प्रत्येक वेळी बदलून येणारा नवीन पोलिस निरीक्षक पाठपुराव्याच्या माध्यमातून आपले पत्र शासनाला देतो, मात्र आजपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्याशिवाय आजपर्यंत काही साध्य झाले नाही. सध्याच्या इमारतीत शौचालय नाही, गटारीची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, इमारतीच्या सभोवताली चिलारीचे साम्राज्य आहे तर इमारतीवर पिंपळाची झाडे उगवली आहेत. संपूर्ण गिलावा निघाला आहे. सध्याचे बांधकाम हे 1950 सालचे आहे. 

मोहोळ पोलिस वसाहती पाठोपाठ मोहोळ पोलिस ठाण्याला स्वतंत्र इमारत नाही. पोलिस ठाण्यात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागाही नाही. सध्या मोहोळ पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली चार बीट व तीन दूरक्षेत्र चौक्‍या कार्यरत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांना एखाद्या गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर पुरेशी जागा नाही, त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. पोलिस ठाण्यात असलेले सध्याचे लॉकअप अत्यंत अपुरे आहे. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जादा आहे, त्यामुळे आरोपींकडे लक्ष देता येत नाही. किमती तसेच अन्य मुद्देमाल ठेवण्यासाठी पुरेशी जागा वा खोल्या नाहीत. चिंचोली औद्योगिक वसाहतीत दहा लाखांची नवीन पोलिस चौकी झाली, जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन पोलिस ठाणी झाली मात्र मोहोळ पोलिस ठाण्याच्या वसाहतीचा प्रश्न तसेच पोलिस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न अद्यापही लालफितीत अडकला आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरून महत्त्वाच्या तसेच अति महत्त्वाच्या मंत्री व अधिकारीऱ्यांची कायम वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. तसेच या परिसरात अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. पोलिस ठाण्याला सुसज्ज क्रेनची आवश्‍यकता आहे. एखादा अपघात झाला तर भाड्याने सोलापूरहून क्रेन मागवावे लागते, त्याशिवाय रस्ता वाहतुकीसाठी खुला होत नाही. खासगी क्रेन व्यावसायिक आपले आर्थिक उखळ पांढरे करून घेतात. 

पोलिस वसाहत व पोलिस ठाण्याची वस्तुस्थिती 

  • सध्याची पोलिस वसाहतीची इमारत 1950 सालची; तिची अत्यंत दुरवस्था 
  • 2018 ला नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल, मात्र अद्यापही तो अनिर्णित 
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी व अहवाल सादर 
  • इमारतीसाठी दीड एकर जागा उपलब्ध 
  • पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण गावे 76 
  • पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली चार बीट व तीन दूरक्षेत्र चौक्‍या कार्यरत 
  • किमती मुद्देमालासाठी जागा नाही 
  • सध्याचे लॉकअप अपुरे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com