कॉंग्रेस अन्‌ राष्ट्रवादीच्या नेत्यांना आठवली वानकरांची ताकद

तात्या लांडगे
Friday, 27 November 2020

ठळक बाबी...

  • युवासेनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या गणेश वानकरांची 'विकास'च्या नेत्यांना आठवण
  • विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे विठ्ठल वानकर यांचे लक्ष; गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतली वानकर कुटुंबियांची भेट
  • शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर यांची भेट घेत राज्यमंत्री पाटील यांनी साधला संवाद
  • राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही वानकर कुटुंबियांची घेतली भेट; पदवीधर व शिक्षक आमदारकीबद्दल केली चर्चा
  • आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकाही एकत्रित लढण्यासंदर्भात झाली चर्चा

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दिग्गजांना घाम काढणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी यापूर्वी युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्‍न सोडविले आहेत. तर त्यांचे वडिल प्रकाश वानकर हे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आहेत. आता विठ्ठल वानकर यांच्याकडे युवासेनेच्या शहरप्रमुखाची जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील वानकरांचे राजकीय प्राबल्य महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार विसरलेले नाहीत. पुणे पदवीधर व शिक्षक आमदारकीनिमित्त सोलापुरात आलेले कॉंग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जुन वानकर यांच्या घरी जाऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

ठळक बाबी...

  • युवासेनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या गणेश वानकरांची 'विकास'च्या नेत्यांना आठवण
  • विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे विठ्ठल वानकर यांचे लक्ष; गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतली वानकर कुटुंबियांची भेट
  • शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर यांची भेट घेत राज्यमंत्री पाटील यांनी साधला संवाद
  • राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही वानकर यांची घेतली भेट; पदवीधर व शिक्षक आमदारकीबद्दल केली चर्चा
  • आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकाही एकत्रित लढण्यासंदर्भात झाली चर्चा

युवासेनेची स्थापना झाल्यानंतर सोलापुरच्या जिल्हाप्रमुखपदी गणेश वानकर यांची निवड झाली. त्यांनी माजी आमदार दिलीप माने, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरुध्द शिवसेनेकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली. पुढील काळात माने आणि वानकर यांच्यात दोस्ताना झाला. आमदारकीला पराभूत झाल्यानंतर वानकर यांनी महापालिकेची निवडणूक लढवित नगरसेवकपद मिळविले. स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांना मिळाले, परंतु आता तो विषय न्यायप्रविष्ठ आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ वानकर कुटुंबियांचे 'मातोश्री'बरोबर घनिष्ठ संबंध आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्याचे नियोजन करण्यात शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांबरोबरच गणेश वानकर, विठ्ठल वानकर यांचाही मोटा वाटा राहिला आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी वानकर कुटुबिंयाची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात काहीवेळ चर्चा केली. यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते. त्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आलेले रोहित पवार यांनीही आवर्जुन विठ्ठल वानकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक अमोल शिंदेही उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही समविचारी पक्षांची मोट मजबूत होण्याच्या दृष्टीने आता तिन्ही पक्षातील नेतेमंडळी संबंधित जिल्ह्यांमधील ताकदवान नेत्यांची भेट घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP leaders remembered the strength of the Wankar family