esakal | कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदेंना दिली चुकीची माहिती ! महेश कोठेंचा आरोप; विषय समित्या सभापती निवडीचा पेच 
sakal

बोलून बातमी शोधा

praniti-shinde-and-mahesh-kothe_201910315901.jpg

...तर भाजपला मिळणार नाही समिती 
केवळ मला विरोध करायचा म्हणून परिवहन सभापती निवडीतही आणि त्यापूर्वीही कॉंग्रेसने आघाडीचा धर्म मोडला. आता विषय समित्यांच्या निवडीसाठी सर्वांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांना विरोध केल्यास निश्‍चितपणे भाजपला एकही समिती मिळणार नाही. मात्र, कॉंग्रेस सोयीचे राजकारण करीत असल्याची चर्चा असून त्यांनी एकदाही आमच्याशी चर्चा केली नाही. दरम्यान, परिवहन सभापतीची मागणी न करताच आमदार प्रणिती शिंदे यांना पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. आता राज्यातील महाविकास आघाडीचा आदर्श ठेवून कॉंग्रेसने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केली आहे.

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदेंना दिली चुकीची माहिती ! महेश कोठेंचा आरोप; विषय समित्या सभापती निवडीचा पेच 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील सत्तेचे समिकरण बदलल्यानंतर महापालिकेत सर्व विरोधक एकत्रित येऊन भाजपला पायउतार व्हावे लागेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली. मात्र, तसे काहीच झाले नाही. आता सर्व विरोधक एकत्र झाल्यास सात विषय समित्यांपैकी एकही समिती भाजपला मिळणार नाही, असा अंदाज भाजपच्याच आमदारांनी व्यक्‍त केला. दुसरीकडे कॉंग्रेस गटनेत्यांनी भाजपला सोबत घेऊन विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपला सोबत घेणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी घेतली आहे.

महापालिकेतील सात विषय समित्यांचे 63 सदस्य निश्‍चित झाले आहेत. त्याची यादी नगरसचिवांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. वास्तविक पाहता सभापती तथा सदस्य निवडीपूर्वी पक्षाच्या शहराध्यक्ष तथा शहरप्रमुखांना त्याची माहिती माहिती देणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे. मात्र, विषय समित्यांच्या सदस्य निवडीनंतर यादी देताना कॉंग्रेसह अन्य गटनेत्यांनी सभापती निवड बिनविरोध करा, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे केली. त्यानंतर महापौरांनी सावध भूमिका घेत शहराध्यक्षांना विचारुन निर्णय घेईन, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे एमआयएमचे नेते तौफिक शेख यांचे नगरसेवकपद सोलापूर न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता कोणाच्या हाती पंतगाची दोरी, हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. तर राष्ट्रवादीचे मोजकेच नगरसेवक असल्याने त्यांनाही पुढाकार घेता येत नसल्याची अडचण आहे. कॉंग्रेसचे सर्व निर्णय शहराध्यक्षांना विचारुन नव्हे तर ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना विचारुनच निर्णय घेतले जातात, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने निश्‍चितपणे आम्हाला सभापती पदे मिळतील, असा विश्‍वास विक्रम देशमुख यांनी व्यक्‍त केला.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले... 
महापालिकेत विरोधी पक्षेनेते म्हणून काम पाहत असताना महेश कोठे यांना चांगला अनुभव आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी मिटींग घेण्याचे निमंत्रण दिले. मात्र, आम्ही महेश कोठे यांच्यावर विषय समित्यांच्या निवडीची जबाबदारी सोपविली आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले. विषय समित्यांच्या निवडीत कशाप्रकारे तोडगा काढायचा, याचा अधिकार कोठेंकडे दिल्याचेही बरडे यांनी सांगितले. 


कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले... 
परिवहन समितीच्या सभापती निवडीत शिवसेनेने ही समिती कॉंग्रेसला देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते आश्‍वासन पाळले नाही. आता महापालिकेत सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून शिवसेनाच आहे. त्यामुळे विषय समित्यांच्या निवडीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना निरोपही दिला आहे. भाजपला सोबत न घेता विषय समित्यांच्या निवडी होतील. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून त्यानुसारच महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी होतील. 


...तर भाजपला मिळणार नाही समिती 
केवळ मला विरोध करायचा म्हणून परिवहन सभापती निवडीतही आणि त्यापूर्वीही कॉंग्रेसने आघाडीचा धर्म मोडला. आता विषय समित्यांच्या निवडीसाठी सर्वांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांना विरोध केल्यास निश्‍चितपणे भाजपला एकही समिती मिळणार नाही. मात्र, कॉंग्रेस सोयीचे राजकारण करीत असल्याची चर्चा असून त्यांनी एकदाही आमच्याशी चर्चा केली नाही. दरम्यान, परिवहन सभापतीची मागणी न करताच आमदार प्रणिती शिंदे यांना पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. आता राज्यातील महाविकास आघाडीचा आदर्श ठेवून कॉंग्रेसने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केली आहे.