स्थायी समितीसाठी शिवसेनेला मदत न करण्याचा कॉंग्रेसने दिला इशारा ! महेश कोठेंनी त्या विषयावर 'उत्तर' दिल्याची नाराजी

3mahavikas_20aaghadhi_0.jpg
3mahavikas_20aaghadhi_0.jpg

सोलापूर : कॉंग्रेसच्या मदतीशिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार स्थायी समितीचा सभापती होऊ शकणार नाही. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी सर्व प्रभागांना समान मिळावा म्हणून माजी पालकमंत्र्यांच्या शहर उत्तर या मतदारसंघासाठीच सर्वाधिक निधी दिल्याची यादी ऍड. यु. एन. बेरिया यांनी सभागृहात आणली. त्यावेळी नरोटे यांनी महेश कोठे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही तुमच्यासोबत असल्याचे कोठे म्हणाले. मात्र, कॉंग्रेसचे नगरसेवक बोलताना कोठे गप्पच बसले. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडीत आम्ही ही दुटप्पी भूमिका हाणून पाडू, असा इशारा नरोटे यांनी दिला.

कोठेंच्या शेजारी बसले वानकर 
तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी अमोल शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे सोपविली. प्रथमच जबाबदारी खांद्यावर आल्याने शिंदे हे कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. त्यामुळे ते दोघेही एकाच बाकावर बसल्याचे चित्र सभागृहात पहायला मिळाले. मात्र, आगामी स्थायी समितीचा सभापती होण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, मनोज शेजवाल हे इच्छूक असल्याची चर्चा आहे. कोठे यांच्या मदतीशिवाय काही होणार नाही, याची जाणीव अनेकांना आहे. या पार्श्‍वभूमीवर शिंदे काहीवेळासाठी बाकावरून उठल्यानंतर त्याठिकाणी गणेश वानकर हे येऊन बसल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर शेजारील बाकावर शेजवाल तर मागील बाकावर धुत्तरगावकर बसल्याचेही दिसून आले. पक्ष बदलला, तरीही सर्वांच्या जागा मात्र त्याच होत्या. त्यामुळे आता स्थायी समितीचा सभापती नेमका कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचा धनुष्यबाण खाली ठेवत महेश कोठे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात घातले. बुधवारी (ता. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व महेश कोठे एकाच बाकावर बसले होते. दरम्यान, आपण कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत काम करू, असे अमोल शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेसाठी शासनाकडून 22 कोटी 50 लाखांचा निधी भेटणार आहे. तत्पूर्वी, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर या मतदारसंघातच सर्वाधिक निधी खर्च होणार असून तशी कामांची यादी प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. एकूण 317 पैकी 150 कामे आमदार देशमुख यांनी सूचविलेली असल्याचे ऍड. बेरिया यांनी यावेळी सभागृहाला सांगितले. त्यानंतर नरोटे यांनी शहरातील सर्वच प्रभागात दलित लोकवस्ती असल्याने त्यांनाही विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले कोठे कॉंग्रेसच्या बाजूने बोलतील, अशी अपेक्षा नरोटे यांना होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून असलेल्या कोठे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा की नाही, हे ठरवू असा इशाराही नरोटे यांनी दिला. या घटनेची माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली जाईल. प्रत्येकवेळी आम्हाला अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे स्थायी समिती असो की अन्य काही, त्यावेळी योग्य तो निर्णय घेऊ, असेही नरोटे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com