मराठा मुलींच्या वसतिगृह इमारतीचा मोहोळमध्ये पार पडला कोनशिला समारंभ ! 

चंद्रकांत देवकते 
Tuesday, 1 December 2020

मराठा सेवा संघाच्या तालुका कार्यालयाचे उद्‌घाटन खुनेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कालिंदी आबासाहेब जाधव यांच्या हस्ते व मराठा मुलींच्या वसतिगृहाच्या कोनशिला समारंभाचे उद्‌घाटन गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी शेळके व स्नेहल साठे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या तालुका कार्यालयाचे उद्‌घाटन खुनेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कालिंदी आबासाहेब जाधव यांच्या हस्ते व मराठा मुलींच्या वसतिगृहाच्या कोनशिला समारंभाचे उद्‌घाटन गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी शेळके व स्नेहल साठे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे म्हणाल्या, की कोरोनाच्या संकटातून स्वत:ला सावरत मराठी माणूस उभारी घेत आहे. अशा वेळी मराठा सेवा संघ व समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून काहीतरी सकारात्मक आणि ठोस सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने येथील बी. एन. गुंड शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाज सेवा संघाच्या तालुका कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे अध्यक्ष व शॉपिंग सेंटरचे मालक यशवंत गुंड यांच्या दातृत्वातून सामाजिक कार्यासाठी मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुमारे दोन हजार चौरस फूट जागेवर मराठा मुलींचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या मराठा मुलींच्या वसतिगृहाचा कोनशिला समारंभ गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी शेळके व स्नेहल साठे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 

या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांनी, नियोजित वसतिगृहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी प्रामुख्याने जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे, नगराध्यक्षा शाहीन शेख, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, उज्ज्वला सांळुखे, संजीवनी मुळे, डॉ. स्मिता पाटील, साधना देशमुख, अंजली काटकर आदींसह यशवंत गुंड, बाळासाहेब गायकवाड, व्ही. आर. पाटील, रामदास चवरे, विष्णू थिटे, डॉ. प्रमोद पाटील, जयवंत गुंड, ऍड. हिंदुराव देशमुख, ऍड. श्रीरंग लाळे, सतीश काळे, आकाश फाटे, तेजस बोबडे, संजीव खिलारे, रमेश दास, राजेश विरपे, राहुल मोरे, संजय शिंदे, अजय कुर्डे यांच्यासह बहुसंख्य मराठा समाजबांधव, भगिनी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cornerstone ceremony of the Maratha girls hostel building was held in Mohol