सर्वाधिक मृत्यू झालेल्या प्रभागातून हद्दपार होतोय कोरोना

तात्या लांडगे 
Thursday, 29 October 2020

प्रभाग तीनमधील नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की, प्रभागातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहावे, या हेतूने सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील सर्व गोरगरीब कुटुंबीयांना सलग 14 दिवस घरपोच जेवण दिले. तर अनेकांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदतही केली. नागरिक घराबाहेर न पडल्याने व नियमांचे त्यांनी पालन केल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यात यश आले.

निर्धार कोरोनमुक्तीचा प्रभाग 3 

 सोलापूर : सोलापुरात आगमन झाल्यानंतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे कोरूना बाधित को-मॉर्बिड रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. सुरवातीच्या काळात या आजाराची रुग्णांमध्ये दहशत होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक 39 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. येथे काळी मृत्यूमध्ये जवळ असणारा हा प्रभाग आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. सध्या या प्रभागातील 13 रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

सोलापूर शहरातील 533 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विशेष म्हणजे 51 ते 60 या वयोगटातील सर्वाधिक 334 रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. 31 ते 50 या वयोगटातील 116 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 31 ते 50 या वयोगटातील सर्वाधिक तीन हजार 315 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 0 ते 15 वयोगटातील अवघ्या 815 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे महापालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येते. प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, नगरसेविका अंबिका पाटील व विजयालक्ष्मी गड्डम यांनी आपल्या प्रभागातून कोरोना हद्दपार व्हावा, कोणीही व्यक्ती कोरोनाचा बळी ठरू नये, या प्रामाणिक हेतूने त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यामुळे अखेर हा प्रभाग आता कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या भागातील नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हा प्रभाग लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्‍वास नगरसेवकांनी व्यक्त केला. 

प्रभाग तीनमधील नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की, प्रभागातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहावे, या हेतूने सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील सर्व गोरगरीब कुटुंबीयांना सलग 14 दिवस घरपोच जेवण दिले. तर अनेकांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदतही केली. नागरिक घराबाहेर न पडल्याने व नियमांचे त्यांनी पालन केल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यात यश आले. 

प्रभाग तीनमधील नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम म्हणाल्या की, प्रभागातील नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहावेत म्हणून मोफत 10 हजार मास्क वाटले. गरजूंना घरपोच धान्यही दिले. प्रभागातील दुकानदारांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले. तर काहींना मोफत वाटपही केले. त्यामुळे प्रभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन तो लवकरच त्यातून मुक्त होईल. 

प्रभागासंबंधी ठळक बाबी.... 

  • - झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती असलेला हा क्रमांक तीनचा प्रभाग 
  • - शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत या प्रभागातील सर्वाधिक 39 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी 
  • - आत्तापर्यंत 355 व्यक्तींना झाली कोरोनाची बाधा; त्यापैकी 303 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • - नागरिकांना घरपोच धान्य व घरपोच जेवण, आरोग्य शिबिर, रॅपिड अँटीजेन टेस्टची मोहीम या उपक्रमांमुळे कमी झाला कोरोनाचा प्रादुर्भाव 

संपादन : अरविंद मोटे 

   

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is being deported from the ward with the highest number of deaths