"कोरोना'बरोबर शेतकऱ्यांना पावसाचाही धक्का 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मंगळवारी (ता. 23) रात्री साडेआठच्या सुमारास शहर- जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष काढण्यासाठी तयार आहेत, पण या पावसामुळे आता द्राक्ष खराब होणार आहेत तर काही शेतकऱ्यांनी आपली द्राक्ष काढून बेदाणा तयार करण्यासाठी बेदाणा शेडवर टाकले आहेत. मात्र आता पाऊस आल्याने तो बेदाणाही काळा पडून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. 

सोलापूर : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. देशासह राज्यात कोरोनाचे संकट उभे असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडणार, हे निश्‍चित झाले आहे. 
मंगळवारी (ता. 23) रात्री साडेआठच्या सुमारास शहर- जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष काढण्यासाठी तयार आहेत, पण या पावसामुळे आता द्राक्ष खराब होणार आहेत तर काही शेतकऱ्यांनी आपली द्राक्ष काढून बेदाणा तयार करण्यासाठी बेदाणा शेडवर टाकले आहेत. मात्र आता पाऊस आल्याने तो बेदाणाही काळा पडून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. 
मागील 10-15 दिवसांपूर्वीही जिल्ह्यात अशाप्रकारे अवकाळी पावसाने कहर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पावसाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट भयानक होत असताना शेतकरी शेतामध्ये न जाता घरी राहणे पसंत करत आहे. त्यातच आता अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याने ते पाहण्यासाठी तरी त्याला शेतात जावे लागणार आहे. आज झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसणार आहे. द्राक्ष बागेशिवाय ज्वारी, गहू, हरभरा, आंबा या इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसणार आहे. जमिनीवर काढून ठेवलेली ज्वारीची कणसे या पावसामुळे काळी होणार आहेत. तशी स्थिती हरभऱ्याचीसुद्धा असणार आहे. आजच्या अवकाळी पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या येऊन पडल्याचे निदर्शनास आले. 

विजांच्या कडकडाटासह 
शहरात धुवाधार पाऊस 
सोलापूर :
शहरात सकाळपासून उन्हाचे चटके बसत होते. शहराचे तापमान 39 सेल्सिअस होते; मात्र रात्री साडेआठच्या सुमारास चौपाड, पूर्व विभाग, होटगी रोड, विजयपूर रोड यासह शहरातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने धुवाधार हजेरी लावली. शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यांना या उन्हाचे चटके सहन करावे लागले. मात्र रात्रीच्या पावसाने शहराचे तापमान कमी होण्यास मदत झाली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With Corona farmer rains also hit