esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ग्रामीण भागात फटाक्‍यांचा आवाज बसलेलाच ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Phatake

"दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असे म्हटले जात असले तरी, या वर्षी दिवाळीचा सण मात्र कोरोना महामारीच्या सावटाखाली अतिशय साध्या पद्धतीने व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा होताना दिसत आहे. त्यातच या वर्षी ग्रामीण भागात दिवाळीमध्ये होणाऱ्या फटाक्‍यांचा आवाज अतिशय कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ग्रामीण भागात फटाक्‍यांचा आवाज बसलेलाच ! 

sakal_logo
By
राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असे म्हटले जात असले तरी, या वर्षी दिवाळीचा सण मात्र कोरोना महामारीच्या सावटाखाली अतिशय साध्या पद्धतीने व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा होताना दिसत आहे. त्यातच या वर्षी ग्रामीण भागात दिवाळीमध्ये होणाऱ्या फटाक्‍यांचा आवाज अतिशय कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. 

दिवाळीचा सण आनंद, उत्साह तसेच दिव्यांचा व फटाक्‍यांचा असला तरी दिवाळीत फटाक्‍यांची आतषबाजी मात्र वरचेवर जीवघेणी ठरत आहे. अगोदरच कोरोनाचे संकट अन्‌ या संकटकाळी दिवाळी साजरी होत असताना फटाके फुटल्यानंतर वायूप्रदूषण होते. त्यामुळे निसर्गाची यंत्रणा बिघडते. माणसांना दम्याचा आजार बळावू शकतो. कोरोना जोर धरू शकतो. या शक्‍यतेने शासनाने फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. याबरोबरच सामाजिक संस्थांनी फटाक्‍यांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन वायूप्रदूषण होते त्यामुळे सामाजिक भान ठेवून फटाके वाजवू नयेत, असे नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनास ग्रामीण भागात तरी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फटाक्‍यांचा आवाज या वर्षी बसल्याचेच जाणवते. 

त्यातच कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने व गेल्या नऊ महिन्यांपासून विद्यार्थी व बच्चेकंपनी घरीच असल्याने तीही आता घरी वैतागली आहेत. त्यांनीही या वर्षी फटाक्‍यांसाठी आग्रह न धरल्याने या वर्षी फटाक्‍यांचा आवाज कमी होण्यास मदतच झाली आहे. 

एकूणच, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसला आहे. त्यामुळे सर्वजण खर्चात काटकसरही करीत आहेत. नागरिकांनी या वर्षी फटाके खरेदीतही काटकसर केली असल्याचे दिसून आले. दरवर्षीप्रमाणे दिसणारा दिवाळीचा उत्साह मात्र यंदा जाणवला नाही. 

याबाबत केत्तूरचे डॉ. दिलीप कुदळे म्हणाले, फटाक्‍यामधील विषारी रसायने हवेत बराच काळ राहात असल्याने श्‍वसनाचे विकार जडू शकतात; तसेच अस्थमा, ऍटॅक, दम लागणे, डोके दुखणे अशा विकारांत वाढ होऊ शकते. 

कुंभेज येथील पक्षीमित्र कल्याणराव साळुंके म्हणाले, फटाक्‍यांच्या आवाजामुळे पशूपक्ष्यांना इजा पोचते. त्यांचा अधिवास धोक्‍यात येऊ शकतो. ज्या ठिकाणी पशूपक्ष्यांचे अधिवास आहे त्या ठिकाणापासून दूर फटाके उडवणे गरजेचे आहे. 

केत्तूर येथील युवक अक्षय माने म्हणाला, आकाशात उंच उडणारे विविधरंगी फटाके बघण्यासाठी सुंदर दिसतात परंतु त्यांचा आवाज मात्र त्रासदायक ठरतो. 

केत्तूर येथील शिक्षक विकास काळे म्हणाले, यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केत्तूर येथील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. फटाक्‍यांच्या प्रदूषणामुळे कोरोनाचा विषाणू जास्त सक्रिय होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. 
केत्तूर येथील विद्यार्थिनी पूर्वा निकम म्हणाली, आमच्या शिक्षकांनी आम्हाला फटाक्‍यांमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले आहेत. त्यामुळे आम्ही फटाके न फोडता त्या पैशातून पुस्तके घेण्याचे ठरवले आहे. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षी फटाक्‍यांना मागणी कमी होती, त्यामुळे आणलेले फटाकेही शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे, असे फटाके विक्रेत्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल