esakal | मंगळवेढ्यात कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू; रूग्णवाहिका झाली नाही उपलब्ध 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona infected person death due to lack of treatment on Mangalvedha ambulance not available

प्रांताधिकारी उदयसिंह भोसले म्हणाले, तालुक्‍यातील वाढती रूग्ण संख्या विचारात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोविडसाठी वापरल्यास नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होणार आहे. त्यासाठी लगतच्या पंढरपूर येथील रुग्णालयातील काही खाटा राखीव ठेवण्यासाठी व ज्यादा रुग्णवाहिकांसाठी प्रयत्न सुरू आहे. तालुक्‍यामध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या अडचणी पालकमंत्री यांच्या कानावर आढावा बैठकीत घेतल्या आहेत. नागरिकांनी चाचणी अगोदर करून घ्यावी. ज्यादा त्रास झाल्यावर अंतिम क्षणी रुग्णालयात दाखल झाल्यास उपचारासाठी अडचणी निर्माण होतात. त्या दृष्टीने नागरिकांचा पुढाकार चाचणीसाठी महत्त्वाचा आहे. 

मंगळवेढ्यात कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू; रूग्णवाहिका झाली नाही उपलब्ध 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्‍टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्‍यात आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले. 
तालुक्‍यात कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे. आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाच्या साह्याने प्रशासन कोरोनाचा सामना करत आहे. शहरात असलेल्या कोविड सेंटरमधील गैरसोयीबद्दलचे सकाळने वृत्त प्रसिद्ध करताच स्वच्छता व आहार पुरवठ्याकडे लक्ष दिले. परंतु मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सेंटरमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा नसल्यामुळे या सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यात रूग्णांचे आर्थिक नुकसान होत आहे. गत आठवड्यात झालेल्या पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये याबाबतची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने सध्य परिस्थितीचा विचार करता आक्रमक पावले उचलणे आवश्‍यक होते. परंतु तशी आक्रमक पावले उचलली नसल्याचे आजच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. 
गणेशवाडी येथील 40 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सकाळी साडेदहा वाजता मंगळवेढ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जादा त्रास होऊ लागल्यामुळे येथील डॉक्‍टरांनी त्याला उपचारासाठी सोलापूरला घेवून जाण्याला सल्ला दिला. परंतु जवळपास एक तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तासाभराने खाजगी वाहनांचा आधार घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मृतदेह त्याच्या गावी नेत असताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तो रस्त्यातून परत मंगळवेढ्यात आणण्यात आला. 

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप म्हणाले, तालुक्‍याची लोकसंख्या व रूग्णसंख्या विचारात घेता भविष्यात इतर ठिकाणी उपचारासाठी गेल्यावर येणाऱ्या अडचणी ऐवजी प्रशासनाने दोन रुग्णवाहिका व ऑक्‍सिजनचा पुरवठा यासह कोविड हॉस्पिटल तातडीने उभा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लक्ष द्यावे. 

संपादन : वैभव गाढवे