लस येण्यापूर्वीच प्रभाग कोरोनामुक्‍त ! नगरसेवकांनी घेतले परिश्रम; जनता कर्फ्यूचा झाला फायदा

तात्या लांडगे
Saturday, 14 November 2020


प्रभागाविषयक ठळक बाबी.. 

 • आतापर्यंत 154 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 144 रुग्णांची कोरोनावर मात 
 • प्रभागातील 10 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी 
 • आता प्रभागात एकही रुग्ण नाही 

सोलापूर : छातीसंबंधी आजार असलेल्यांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहरातील विडी कामगार, वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या कामगारांवर वॉच ठेवायला सुरवात झाली. विडी उद्योग आणि वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या कामगारांची लक्षणीय संख्या असलेला 19 नंबरचा प्रभाग आता कोरोनामुक्‍त झाला आहे. या प्रभागात एप्रिलमध्ये पहिला रुग्ण सापडला आणि काही दिवसांतच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांच्या काळजीपोटी नगरसेवकांनी पोलिसांच्या मदतीने जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याचा मोठा फायदा झाला आणि नगरसेवकांच्या प्रयत्नातून आता हा प्रभाग कोरोनामुक्‍त झाला आहे.

प्रभागाविषयक ठळक बाबी.. 

 • आतापर्यंत 154 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 144 रुग्णांची कोरोनावर मात 
 • प्रभागातील 10 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी 
 • आता प्रभागात एकही रुग्ण नाही 

 

निलम नगर, आकाशवाणी केंद्र परिसर, विनायक नगर, शांती नगर, देसाई नगर, कुमारस्वामी नगर, गवळी वस्ती, साईबाबा चौक या परिसरात रुग्णसंख्या लक्षणीय होती. नगरसेवक तथा सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड, अनिता कोंडी यांनी घरोघरी जाऊन संकट काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर गरजूंना घरपोच धान्य, जेवण वाटप केले. स्वत:चे मानधन त्यासाठी खर्च करुन लोकसेवा केली. आरोग्य शिबिरे आणि रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून संशयितांवर वॉच ठेवला. कोरोना वॉरिअर्सच्या मदतीने 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांवर वॉच ठेवला. फॅमिल प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून फिव्हर ओपीडी सुरु केली. डॉ. हिरालाल अग्रवाल, डॉ. महेश भंडारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासात रुग्णांना मोफत औषध- गोळ्या दिल्या. या काळात नागरिकांनी कोरोनाविरुध्दची लढाई स्वत: हाती घेतली आणि या प्रभागात मागील सात दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. 

'लोकमंगल'ची झाली मोठी मदत 
प्रभागात पहिला रुग्ण सापडला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून जनसेवा केली. पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभले. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून परिसरात लोकमंगल हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले. 'लोकमंगल'च्या माध्यमातून गरजूंना घरपोच जेवण दिले. नागरिकांच्या सहकार्यातून आता हा प्रभाग मोकळा श्‍वास घेत आहे. 
- वरलक्ष्मी पुरुड, नगरसेविका 

जनता आणि पोलिसांच्या सहकार्यामुळेच यश 
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या सहकार्यातून प्रभागात पहिला जनता कर्फ्यू लागू केला. नागरिकांनी नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घराबाहेर पडणे टाळले. आरोग्य शिबिरे, नगरानगरांमध्ये फिव्हर ओपीडी राबविली. त्यामुळे संशयितांवर वेळेत उपचार झाले आणि हा प्रभाग कोरोनामुक्‍त झाला. त्याचे संपूर्ण श्रेय नागरिकांनाच जाते. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Corona infection in Ward 19 stopped completely