लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांमुळे डोकेदुखी; ग्रामीण भागात अफवांना उधाण 

दत्तात्रय खंडागळे 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अफवांना बळी पडू नये 
कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढ होत आहे. परंतु नागरिकांनी यामध्ये अफवांना बळी पडू नये. पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णास इतरांचा संपर्क होऊ नये यासाठी विलगीकरण अत्यावश्‍यकच असते. अनेक जणांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना कोणतीच लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यापासून संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना विशेषता वयोवृद्धांना याचा धोका संभवतो. रुग्णांसाठी शासनाकडून ठराविक रक्कम मिळत नाही. प्रत्येकाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन करावे. 
- उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा 

सांगोला (सोलापूर) : सध्या ग्रामीण भागात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या लक्षणे नसलेल्या रुग्णवाढीने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत असून अफवांनाही उधान आले आहे. यामुळे अनेक जण कोरोना चाचणीसाठी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र सांगोला तालुक्‍यात दिसत आहे. 
सांगोला तालुक्‍यात कोरोनाचे रुग्णांचे शतक झाले असून एक ऑगस्ट रात्रीपर्यंत 114 रुग्ण झाले आहे. 83 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेक रुग्णांना कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. परंतु अहवाल चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात येते. लक्षणे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. अधिकारी वर्ग पैसे मिळवण्यासाठी रुग्ण पॉझिटिव्ह दाखवतात, संपर्कातील व्यक्तींनाही कोणतीच लक्षणे नसतानाही त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येते. त्यामध्येही अनेक जण पॉझिटिव्ह येतात. हे प्रत्येक रुग्णामागे पैसे मिळविण्यासाठी केले जाते अशा, अनेक अफवा सध्या सोशल मीडियावरून व्हिडीओद्वारेही प्रसारित होत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचीची नावे मिळवणेही सध्या कठीण झाले आहे. लक्षणे नसली तरीसुद्धा कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी त्या रुग्णास कोविड सेंटर येथे विलगीकरण कक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे त्याचा संपर्क इतरांशी होऊ नये, कोरोनाची साखळी तुटावी हाच प्रमुख हेतू असतो. जिल्ह्यातील इतर तालुक्‍याच्या मानाने सांगोल्यात रुग्णांची संख्या कमी असली तरी ही नागरिकांनी काळजी घेणे फार गरजेचे आहे. 

सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे नसली तरी ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असू शकते. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांच विलगीकरणं होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रती कोरोना रुग्ण नगरपालिकेस ठराविक रक्कम शासनाकडून मिळत असल्याच्या अफवा काही बेजबाबदार व्यक्तींकडून पसरवल्या जात आहेत. शासनाची अशी कुठलीही योजना नसून यापुढे समाज माध्यमातून अश्‍या प्रकारच्या अफवा पसरविणारे व त्या स्वरूपाचे एसएमएस फॉरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. 

तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी म्हणाल्या, लक्षणे नसलेल्या रुग्णांची सध्या वाढ होत आहे. फक्त असे सांगोल्यातच आहेत असे नाही तर असे रुग्ण सगळीकडेच आढळून येतात. विलगीकरणात ठेवले तर त्यांचा इतरांशी संपर्क तुटतो. तसेच त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींनी कोरोना चाचणीसाठी पुढे आले पाहिजे. कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. 

पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, कोरोनाबाबत कोणीतीही चुकीची अफवा पसरवू नये. अनेक ठिकाणी सध्या लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णबाबत अफवा पसरविल्या जात असल्याचे खात्री पटल्यास असे मेसेजेस पाठवणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infestations spread rumors in rural areas