सोलापूर जिल्ह्यात चार ठिकाणी "कोरोना' तपासणी 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 20 मार्च 2020

तालुकास्तरावर होणार निगराणी कक्ष 
सोलापूर शहरात 490 जणांना निगराणीखाली तर सध्या 67 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था आहे. जिल्हास्तरावर ही क्षमता पुरेशी असून आता तालुकास्तरावर निगराणी कक्ष स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना तहसीलदारांना करण्यात आल्या आहेत. सोलापुरातील 14 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 11 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 3 जणांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. बाहेरच्या देशातून 67 जण सोलापूर जिल्ह्यात आले आहेत. त्यातील 5 जणांना निगराणीखाली ठेवून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित व्यक्तींना आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शेजारच्या राज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश आज राज्य शासनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानुसार कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात चार नाके करण्यात येणार आहेत. अक्कलकोट तालुक्‍यात वागदरी, दुधनी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नांदणी आणि मंगळवेढा तालुक्‍यातील मरवडे येथे हे तपासणी नाके कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या नाक्‍यावर आरोग्य, आरटीओ व पोलिस विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक असणार आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/pandharpur-market-committee-decides-close-till-march-31-272282">हेही वाचा - कोरोना इफेक्‍ट : पंढरपूर बाजार समिती प्रशासनाचा मोठा निर्णय 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशिय सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह आरोग्य, महसूल व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना प्रशासनाच्यावतीने केल्या जात आहे. या उपाययोजना करण्यासाठी बजावण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन व कोरोना संदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी आतापर्यंत 48 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही पान टपरी सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 22) जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona inspection at four places in Solapur district