करमाळा तालुक्‍यात पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत वाढ; नवे 52 कोरोनाबाधित 

अण्णा काळे
Thursday, 3 September 2020

करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्‍यात एकूण 186 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यात तब्बल 52 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करमाळा तालुक्‍यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज करमाळा शहरात 81 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 19 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 105 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या असून यात 33 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करमाळा तालुक्‍यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 782 वर जावून पोहोचली आहे. 
आजपर्यंत तालुक्‍यातील 466 कोरोनाबाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या तालुक्‍यातील 300 जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्‍यात एकूण 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak in Karmala taluka again 52 new affected