पूर्वी सोलापूर अन्‌ आता उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश असलेल्या गावात कोरोनाचा रुग्ण 

बाबासाहेब शिंदे 
गुरुवार, 28 मे 2020

नुकताच कारीचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश 
कारी गाव बार्शी तालुक्‍यातील शेवटचे गाव असून ते पूर्वी बार्शी तालुक्‍यात होते. मध्यंतरी कारी गावचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश झाला असला तरी पांगरी पोलिस ठाणे अंतर्गत बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा पुरवत आहेत. 

पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पांगरीपासून आठ किलोमीटर असलेल्या कारी येथे कोरोना विषाणूने प्रवेश केला असून एक व्यक्ती बाधित आढळल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून कारी गावच्या सीमा बंद करण्याचे आदेश उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांनी दिले आहेत. गावापासून तीन किलोमीटर रेड झोन तर सात किलोमीटर बफर झोन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, पुर्वी कारीचा सोलापूर जिल्ह्यात समावेश होता. मात्र काही महिन्यांपुर्वी या गावाचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश झाला आहे. 

कारी येथील अनेक व्याधीने ग्रासलेल्या 69 वर्षीय व्यक्तीवर खासगी रुग्णालयात 10 दिवसांपासून उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्यात कोरानाची लक्षणे आढळल्याने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो रिपोर्ट कोरोना बाधित आला आहे. या व्यक्‍तीची अधिक माहिती घेतली असता ती बाहेर गावाहून प्रवास करून आली नसल्याचे पांगरीचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले. कारी गाव पूर्णपणे सील केले असून कडेकोट बंदोबस्त आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
आढळलेला रुग्ण द्राक्ष बागायतदार असल्याने त्याच्या संपर्कात 42 शेतमजूर आले आहेत. संपर्कातील सर्वांना ग्रामपंचायतच्या वतीने कारी जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले आहेत. उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार गावात जोडणारे कारी-पांगरी, कारी-नारी, कारी-सोनेगाव अन्य छोट-मोठे रस्ते बंद करण्याचे काम ग्रामसेवक यू. आर. माळी, तलाठी ए. बी. पवार यांनी केल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता नागरिकांनी विनाकारण बाहेर जाऊ नये, असा आदेश 27 मेपासून पुढील आदेश येईपर्यंत निर्गमित करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी तपासणी व संपर्कात आलेल्याचे सर्वेक्षण सुरू केल्याचे परिचारिका ए. बी. उबरदंड यांनी सांगितले. विलगीकरण कक्षातील सर्वांवर आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient in Kari village in former Solapur and now Osmanabad district