esakal | धक्कादायक प्रकार : सोलापुरात अंत्यविधी करून आल्यानंतर समजले मृत व्यक्ती होती कोरोना बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona to the person who died in Solapur

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्णिक नगर परिसरातील 75 वर्षीय महिलेचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी करून आल्यानंतर मयत झालेली ती महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आणि अंत्यविधीला गेलेल्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.

धक्कादायक प्रकार : सोलापुरात अंत्यविधी करून आल्यानंतर समजले मृत व्यक्ती होती कोरोना बाधित

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्णिक नगर परिसरातील 75 वर्षीय महिलेचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी करून आल्यानंतर मयत झालेली ती महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आणि अंत्यविधीला गेलेल्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. 
या परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापुरातील एका नामांकित खासगी रुग्णालयामुळे सोलापुरातील कोरोनाबाधितांची  संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता सोलापुरातील दुसऱ्या एका नामांकित खासगी रुग्णालयांनी हा धक्कादायक प्रकार केला आहे. कर्णिक नगर मधील 75 वर्षीय महिलेला बारा दिवसांपूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेचा बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. चारच्या सुमारास नातेवाईक, परिसरातील नागरिक, शेजारी यांच्या उपस्थितीत अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ही महिला कोरोना बाधित असल्याचे आज दुपारी समजताच त्या मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्यांसह, नातेवाईक, शेजारी यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सोलापुरातील नामांकित रुग्णालयाबद्दल संताप व चीड व्यक्त केली जात आहे. मयत झालेल्या  महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतलेला असतानाही तिचा मृतदेह नातेवाईकांकडे दिलाच कसा? सोलापुरातील त्या नामांकित रुग्णालयाने हा हलगर्जीपणा केला असून त्यांच्या हलगर्जीपणाचे नुकसान अनेकांना सोसावे लागण्याची शक्यता आहे. मयत महिला कोरोनाबाधित असल्याचे आज निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने त्यामुळेच महिलेच्या कुटुंबातील सदस्य, शेजारील अशा सोळा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पुढील चाचणीसाठी त्यांना जिल्हा  प्रशासनाने ताब्यात घेतले घेतले आहे. संपर्कात आलेल्या उर्वरित व्यक्तींचाही शोध सुरू असून त्यांनाही पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.

हलगर्जीपणाचा होतोय कहर
सोलापूर शहर व परिसरातील काही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आल्या म्हणून त्यांना सोडण्यात आले. काही वेळानंतर त्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजतात त्या व्यक्तींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या घटना घडलेल्या असताना आज घडलेला प्रकार सोलापूरकरांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.