15 डिसेंबरनंतर दुसरी लाट ! सध्याच्या रुग्ण संख्येत होईल 10 टक्‍के वाढ 

तात्या लांडगे
Saturday, 21 November 2020

शहर- जिल्ह्यात वाढेल कोरोना प्रादुर्भाव 
शहरात आतापर्यंत दहा हजार 75 तर ग्रामीण भागात 33 हजार 790 व्यक्‍ती आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर एक हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यात दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दूधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. दुसऱ्या लाटेत शहर- जिल्ह्यातील आणखी 60 हजारांपर्यंत व्यक्‍तींना कोरोनाची बाधा होऊ शकते. तर दोन हजारांपर्यंत रुग्णांचा मृत्यू होईल, अशीही शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली. या पार्श्‍वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन करणे हाच एकमेव उपाय असल्याचेही डॉ. दूधभाते यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : 1918 मधील स्पॅनिश व्हायरसच्या दुसऱ्या लाटेवरुन कोरोनाचीही दुसरी लाट येऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविली आहे. ही लाट 15 डिसेंबरनंतर, जानेवारीअखेर अथवा फेब्रुवारीच्या प्रारंभीही येऊ शकते, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यातील सुमारे 60 हजार व्यक्‍तींना कोरोना होईल. तर सध्याच्या मृत्यूसंख्येत दहा टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरू दूधभाते यांनी दिली. मात्र, नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास दुसरी लाट टळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

वयोमानानुसार मृत्यू व रूग्ण 

 • वयोगट           रुग्ण       मृत्यू 
 • 0-15              847        1 
 • 16-30            2,214     17 
 • 31- 50           3,513     69 
 • 51-60            1,655    122 
 • 60 वर्षांवरील  1846     346 

राज्यात 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत. दुसरीकडे 31 ते 50 वयोगटातील व्यक्‍ती सर्वाधिक कोरोना बाधित आढळल्या आहेत. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. हात स्वच्छ ठेवावेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि थुंकू नये. अनावश्‍यक प्रवास टाळावा, मानसिक ताण- तणावात नातेवाईकांशी बोलावे व तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाच्या संकट काळात आपले कुटूंब सुरक्षित कसे राहील, यास प्राधान्य द्यायला हवे. कुटुंबातील लहान मुले व को- मॉर्बिड रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन डॉ. दूधभाते यांनी केले आहे. 

संभाव्य उपाययोजना 

 • किरणा दुकानदार, भाजी विक्रेते, पथविक्रेत्यांसह हॉटेल मालक, विक्रेते व घरपोच सेवा देणाऱ्यांची केली जाईल टेस्ट 
 • वाहतूक व हमाली, रंगकाम, बांधकामावरील मजुरांच्या टेस्टलाही दिले जाणार प्राधान्य 
 • फ्ल्यू सदृश्‍य रुग्णांचे नियमित करावे सर्वेक्षण; सात टक्‍क्‍यांपेक्षा कमी रुग्ण आढळल्यास पाच ते सात रुग्णालयांची उपलब्धता 
 • सात ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत रुग्ण आढळल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शहर व तालुक्‍यातील रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय 
 • 11 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्ण आढळत असल्यास एकूण 20 टक्‍के रुग्णालयांमध्ये केले जातील कोरोनाबाधितांवर उपचार 
 • 16 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्ण वाढत असल्यास मल्टिस्पेशॅलिटी व्यवस्थापनाची सोय असणारी रुग्णालये उपलब्ध केली जातील 
 • 20 टक्‍क्‍यांहून अधिक रूग्ण आढळल्यास सर्वच प्रकारच्या रुग्णालयांमधून होतील रुग्णांवर उपचार 

शहर- जिल्ह्यात वाढेल कोरोना प्रादुर्भाव 
शहरात आतापर्यंत दहा हजार 75 तर ग्रामीण भागात 33 हजार 790 व्यक्‍ती आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर एक हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यात दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दूधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. दुसऱ्या लाटेत शहर- जिल्ह्यातील आणखी 60 हजारांपर्यंत व्यक्‍तींना कोरोनाची बाधा होऊ शकते. तर दोन हजारांपर्यंत रुग्णांचा मृत्यू होईल, अशीही शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली. या पार्श्‍वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन करणे हाच एकमेव उपाय असल्याचेही डॉ. दूधभाते यांनी स्पष्ट केले. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: The corona second wave after December 15! The current number of patients will increase by 10 percent