धक्कादायक प्रकार! तुरुंग अधीक्षकांच्या पत्रांनंतर नेले उपचारासाठी; अन् चक्क 'तो' निघाला पॉझिटिव्ह...

तात्या लांडगे
Thursday, 28 May 2020

रिपोर्ट अन् उपचार पद्धतीच्या संशोधनाची गरज
सोलापुरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्यास निमोनिया झाला होता. तो 20 मेपासून सुट्टीवर होता. मात्र, त्याला निमोनिया झाल्याने केगाव येथील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने मला फोन करून उपचाराची मागणी केल्यानंतर संबंधित आयसोलेशन कक्षातील अधिकाऱ्याला लेखी पत्र दिले आणि त्या कर्मचाऱ्यावर उपचार करण्याची मागणी केली. त्यानंतर त्याला 24 मे रोजी कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आणि बुधवारी (ता. 27) त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दरम्यान, अशी परिस्थिती असतानाही त्या कर्मचाऱ्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये इतके दिवस का ठेवण्यात आले आणि त्याला कोरोनाची बाधा झाली कुठे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
- डी. एस. इगवे, तुरुंग अधीक्षक, सोलापूर

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तत्पूर्वी, तो 20 मेपासून रजेवरच होता आणि निमोनिया झाल्याने त्याला केगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. मात्र, त्याच्यावर उपचार होत नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला तुरुंग अधीक्षकांनी लेखी पत्र दिले. 24 मे रोजी त्याला कुंभारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. 27) त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार म्हणजे संशोधनाचा आहे, असे तुरुंग अधिक्षक डी. एस. इगवे म्हणाले.
जिल्हा कारागृहात काम करणारा तो कर्मचारी त्याच्या आईसोबत शासकीय क्वार्टरमध्ये राहतो. तर त्याची पत्नी व मुले पुण्यात आहेत. तो 22 तारखेपासून रजेवर होता. त्याला निमोनीया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला क्वारंटाईन करण्यात आले. त्या कर्मचार्‍यावर उपचार करावेत, असे पत्र दिल्यानंतर त्याला नेण्यात आले. यापूर्वीही जिल्हा कारागृहातील एका कैद्यास साधा ताप आल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच वार्डात दुसरे कोरोना संशयित रुग्णही ठेवण्यात आले होते. चार दिवसानंतर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली, हाही प्रकार धक्कादायकच आहे, असेही इगवे म्हणाले. तो कर्मचारी सुट्टीवर असल्याने त्याचा तुरुंगातील कोणत्याही व्यक्तीशी संबंध आलेला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विलगिकरण कक्षच असुरक्षित
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना खबरदारी म्हणून संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवले जाते. पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासह अन्य ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्याची सोय केली आहे. त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी अपुरे मनुष्यबळ, एकाच खोलीत काही व्यक्ती, लक्षणे असूनपण उपचार तथा रिपोर्ट उशीरा येणे, स्वछता तथा सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीट नाही, विलगीकरण कक्षात आणताना अथवा नेताना सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन होत नाही, अशी दुरावस्था त्याठिकाणी असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'सकाळ'शी बोलताना दिली. तर असे प्रकार होत नसल्याचे सांगत हे सर्व खोटे असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to the staff of the District Central Jail in Solapur