सभेपूर्वी नगरसेवकांना कोरोना टेस्टची सक्‍ती ! टेस्ट न करणाऱ्याला प्रवेश बंदी 

Coronavirus
Coronavirus

सोलापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा 10 ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे. या सभेपूर्वी सर्व नगरसेवक व उपस्थित अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांना सभेत प्रवेश दिला जाणार असून, टेस्ट न करणाऱ्यांना सभेला बसता येणार नाही, असे फर्मान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी काढले आहे. त्यांनी महापालिका आयुक्‍तांसमवेत याबाबत चर्चा केली आहे. 

महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच विकासकामांवर चर्चा होण्यासाठी दरमहा सर्वसाधारण सभा घेतली जाते. फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत सभाच न झाल्याने 44 विषय सरकार दरबारी पाठविण्यात आले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून 15 सप्टेंबरनंतर एकाच आठवड्यात तीन सभा पार पडल्या. या सभेला उपस्थित नगरसेवक आनंद चंदनशिवे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर आणखी तीन नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. सभागृहातील गोंधळ, एकाच बाकडावरील नगरसेवकांची गर्दी पाहता, आता सभेच्या दोन दिवस अगोदर सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची रॅपिडऐवजी "आरटीपीसीआर' टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, कोरोनाची शहरातील स्थिती आणि सभागृहातील परिस्थिती पाहता आगामी सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच घ्यावी, अशी आग्रही मागणीही आरोग्य विभागाने केल्याचे आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. तर माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांनी सभागृहातच सभा घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

सभागृहात सभा नकोच; काही पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा विरोध 
शहरातील कोरोनाची स्थिती अद्याप चिंताजनक असून रॅपिड टेस्टमधून अचूक निदान होणे कठीण आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व नगरसेवकांची "आरटीपीसीआर' टेस्ट करून त्यांना सभागृहात प्रवेश द्यावा, अशी विनंती आरोग्य विभागाने महापौरांसह महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे. मात्र, कोरोनाची शहरातील सद्य:स्थिती चिंताजनक असून नगरसेवकांचा कामानिमित्त अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभा सभागृहात नको, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच घ्यावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली आहे. मात्र, कोरोनाच्या नावाखाली अतितातडीचा खर्च म्हणून अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी अशी मागणी होत असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांची "आरटीपीसीआर' टेस्ट केली जाईल 
याबाबत महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, पदाधिकारी, नगरसेवकांच्या मागणीनुसार आगामी सर्वसाधारण सभाही सभागृहातच घेतली जाईल. त्यासंदर्भात आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली असून सभागृहात येण्यापूर्वी सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांची "आरटीपीसीआर' टेस्ट केली जाईल. त्यात निगेटिव्ह आलेल्यांना तथा टेस्ट करून घेतलेल्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com