सांगोला तालुक्‍यात शिक्षक, आधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ! 12 पॉझिटिव्ह 

दत्तात्रय खंडागळे 
Tuesday, 26 January 2021

प्रभात फेरीत तालुक्‍यातील एकूण 2 हजार 268 अधिकारी व कर्मचाऱ्यांची, तसेच 483 पदाधिकारी व नागरिक असे एकूण 2 हजार 751 व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले व उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले. 

सांगोला : तालुक्‍यातील सर्वच गावांमध्ये पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभात फेरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रभात फेरीमध्ये शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्‍यात घेण्यात आला. उपक्रमात तालुक्‍यातील एकूण 2 हजार 268 अधिकारी व कर्मचाऱ्यांची, तसेच 483 पदाधिकारी व नागरिक असे एकूण 2 हजार 751 व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले व उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्याचा हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याने या उपक्रमाचे पूर्ण सांगोला तालुक्‍यात कौतुक करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासनाने 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोमवारी (ता. 25) जिल्ह्यातील सर्व गावांत प्रभातफेरी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रभात फेरीचा उद्देश मुलांना शाळेत पाठवावे यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा होताच, शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "माझे गाव कोरोनामुक्त गाव' या अभियानाचा भाग म्हणून कोरोना विरोधात लढाई तीव्र करणे, कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेण्यासाठी जनजागरण करणे हा सुद्धा उद्देश होता. शिवाय 25 जानेवारी हा दिवस मतदार दिवस असल्याने मतदारांमध्ये जनजागृती करणे, या उद्देशाने देखील या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रभात फेरीचे गावनिहाय नियोजन केले. त्यानुसार सोमवारी सर्व 76 गावांत प्रभात फेरीचा कार्यक्रम पार पडला. या प्रभात फेरीमध्ये प्रत्येक गावातील ग्रामसेवक, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका सहभागी झाल्या. तसेच महसूल विभागाचे तलाठी व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी सुद्धा प्रभात फेरीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या प्रभात फेरीत तालुक्‍यातील एकूण 2 हजार 268 अधिकारी व कर्मचाऱ्यांची, तसेच 483 पदाधिकारी व नागरिक असे एकूण 2 हजार 751 व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले व उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले. 

सोमवारी झालेल्या प्रभात फेरी व कोविड चाचणीमुळे नागरिकांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांनी निर्भयपणे शाळेत यावे, तसेच नागरिकांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती कमी करून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी निश्‍चितच या उपक्रमाचा फायदा होणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रितपणे सांघिक भावनेने काम केल्याने हा उपक्रम यशस्वी झाला 
- संतोष राऊत, 
गटविकास अधिकारी, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test of teachers and officers was conducted in Sangola taluka