आषाढीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

तिहेरी नाकाबंदी 
आषाढी यात्रा काळात बाहेरुन भाविक येवून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. हा धोका टाळ्यासाठी जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर तिहेरी नाकाबंदी केली जाणार आहे. पंढरपूर शहरात देखील विविध 15 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे, असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कवडे यांनी सांगितले. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरची आषाढा यात्रा रद्द झाली असली तरी, खबरदारी म्हणून पंढरपूर शहरात सुमारे 1 हजार 200 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वारीकाळात बंदोबस्तासाठी बाहेरुन येणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या अनुषंगाने सर्व ती वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये तंदुरुस्त असणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच बंदोबस्ताची जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी यात्रेचा महासोहळा रद्द केला असला तरी आषाढी वारी दरम्यानचे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मातेचे सर्व नित्योपचार आणि पुजा सुरु आहेत. विठ्ठलाची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावी, अशी भावना राज्यभरातील वारकऱ्यांची आहे. त्या दृष्टीने विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने तसे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रणही दिले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रातील सांस्कृतिक सोहळा मानली जाणारी आषाढी यात्रा रद्द केली. देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्या ही जैथे थांबवण्यात आल्या आहेत. भाविकांची गर्दी टाळ्यासाठी प्रशासनाने प्रथमच प्रमुख संतांच्या पादुका थेट हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणल्या जाणार आहेत. 
या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कवडे म्हणाले की, 1 जुलै रोजीचा पंढरपुरातील आषाढी यात्रेचा सोहळा होणार असला तरीही, राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरीत येण्याची शक्‍यता आहे. ऐन यात्रा काळात बाहेरुन भाविक येवून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. हा धोका टाळ्यासाठी जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर तिहेरी नाकाबंदी केली जाणार आहे. पंढरपूर शहरात देखील विविध 15 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. वारी बंदोबस्तासाठी जवळपास 1 हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी येणार आहेत. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या अनुषंगाने सर्व ती आरोग्य तपासणी केली जाणार आहेत. बंदोबस्त काळात देखील सर्व पोलिसांची नियमित तपासणी केली जाणार असल्याचेही डॉ. कवडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test will be carried out by the police coming for the protection of Ashadi wari