"चेस द व्हायरस' : अकलूजमधील व्यापारी, गाळेधारकांची होणार कोरोना टेस्ट 

शशिकांत कडबाने 
Saturday, 5 September 2020

माळशिरस तालुक्‍यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत चेस द व्हायरस संकल्पनेतून कोरोना रुग्ण शोधून त्याच्यापासून होणारा संसर्ग थांबवण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

अकलूज (सोलापूर) : अकलूज परिसरातील व्यापारी, सर्व गाळेधारक, फळे व भाजी विक्रेते यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. 

माळशिरस तालुक्‍यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत चेस द व्हायरस संकल्पनेतून कोरोना रुग्ण शोधून त्याच्यापासून होणारा संसर्ग थांबवण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीस तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, "शिवामृत'चे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे, उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. सुप्रिया खडतरे, डॉ. संतोष खडतरे आदी उपस्थित होते. 

या बैठकीतील निर्णयानुसार सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी कोरोना टेस्ट घेण्यासदंर्भात आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केले असून विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल समोरील व नवीन एसस्टी स्टॅंड मागील व्यापारी, गाळेधारक, फळे व भाजी विक्रेते यांची क्रीडासंकुल येथे, प्रतापसिंह चौक येथील जिल्हा परिषद शाळा गणेशनगर येथे, महात्मा फुले भाजी मंडई येथील जुने एसटी स्टॅंड येथे टेस्ट घेण्यात येणार आहे. रविवारी (ता. 6) शिवापूर येथील व्यावसायिकांच्या बहुउद्देशीय सभागृह व कौलारू शाळा येथे, सोमवारी (ता. 7) गांधी चौक, जुने एसटी स्टॅंड येथील बहुउद्देशीय सभागृह, जुने एसटी स्टॅंड येथे तर मंगळवारी (ता. 8) जुने एसटी स्टॅंडपासून ते सदुभाऊ चौक ते प्रतापसिंह चौक या मार्गावरील गाळेधारक, व्यापारी यांची सदाशिवराव माने विद्यालय व जिल्हा परिषद शाळा गणेशनगर येथे टेस्ट घेण्यात येणार आहे. 
त्याचबरोबर या व्यावसायिकांच्या कुटुंबातील 55 वर्षांवरील आजारी रुग्णांच्या, प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व आजारी रुग्ण तसेच दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांच्याही कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहेत. या टेस्ट माळशिरस तालुका आरोग्य विभाग व प्रायव्हेट लॅब टेक्‍निशियन यांच्या सहाय्याने घेण्यात येणार असल्याचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona test will be held for traders and squatters in Akluj