
सांगोला (सोलापूर) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सांगोल्यातील सर्व व्यावसायिकांच्या मालकांसह कामगारांचीही कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार यांनी केले.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव सांगोला तालुक्यात वाढू नये यासाठी सांगोला बचत भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीसाठी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार, तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार पुढे म्हणाले की, नागरिकांसह सर्व व्यापारी बंधूंनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील म्हणाले की, सांगोल्यामध्ये विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये भीती बाळगण्याचे कारण नसून, दुकानदारांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यात येणार आहेत. सध्याच्या काळात होम आयसोलेशनसाठी कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. यापुढील काळात बाहेर जाणारे ड्रायव्हर व इतर नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की, या अगोदरही शहरातील सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्व व्यावसायिकांनी ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे. दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून यासाठी सर्व नियोजन केले जाईल.
कोव्हिड सेंटरला सर्व सोयीसुविधा देणार
सध्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सांगोला येथील फॅबटेक कॉलेजमध्ये बुधवार (ता. 17) पासून पुन्हा कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोव्हिड सेंटरविषयी नागरिकांनी भीती किंवा गैरसमज बाळगण्याचे कारण नसून, या सेंटरवर रुग्णांना सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील यांनी दिली.
सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी मास्क न वापरल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास अशा नागरिकांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल
- भगवान निंबाळकर,
पोलिस निरीक्षक, सांगोला
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.