सोलापूर ग्रामीणमध्ये "कोरोना'ही झाला अनलॉक, लॉकडाऊनमध्ये 1688 तर अनलॉमध्ये 1965 बाधित 

प्रमोद बोडके
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासन व राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या या लढ्यात नागरिकांनीही आपले योगदान द्यावे. जिल्ह्यातील कोरोना चाचणी क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालयात आरटीपीसीआरद्वारे प्रतिदिन शंभर तर अकलूजमधील अश्‍विनौ हॉस्पिटलमध्ये ट्रूनॅटद्वारे प्रतिदिन वीस चाचण्या घेता येतील, अशी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- प्रकाश वायचळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत पाच लॉकडाऊन तर तीन वेळा अनलॉक झाला. 31 जुलैपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 653 एवढी झाली. त्यामधील 1688 कोरोनाबाधित हे लॉकडाऊनमध्ये उघडकीस आले तर 1965 कोरोनाबाधित हे अनलॉकमध्ये उघडकीस आले आहेत. अनलॉमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. 

मुंबई, पुण्यात असलेला कोरोना बघता बघता सोलापुरात आला. सोलापुरातील कोरोना तालुक्‍यात आणि नंतर गावात आला. आता कोरोनाच्या विळख्यात वाड्या आणि वस्त्याही आल्याने कोरोनाची दहशत बांधापर्यंत पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 12 एप्रिल रोजी सोलापूर शहरात सापडला. त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाची लागण थोडी उशिरा झाली.

सोलापूर शेजारी असलेल्या तालुक्‍यांमध्ये आज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख वाढली आहे. त्यातच ग्रामीण भागात अँटीजेन टेस्टला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे ग्रामीणची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्‍तींच्या संख्येनेही शंभरी ओलांडली आहे. बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात दिवसेंदिवस वाढणारी मृतांची संख्या चिंताजनक आहे. 
 
लॉकडाऊनमध्ये असा वाढला कोरोना 
दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे : 1 रुग्ण 
तिसरा लॉकडाऊन : 4 ते 17 मे : 4 रुग्ण 
चौथा लॉकडाऊन : 18 ते 30 मे : 34 रुग्ण 
पाचवा लॉकडाऊन : 16 ते 26 जुलै : 1649 रुग्ण 
 
अनलॉकमध्ये असा वाढला कोरोना 
पहिला अनलॉक : 1 ते 30 जून : 321 
दुसरा अनलॉक : 1 ते 16 जुलै : 811 
तिसरा अनलॉक : 27 जुलै ते आजतागायत : 833 रुग्ण (31 जुलैपर्यंत) 
 
प्रतिदिन कोरोना चाचणीची व्यवस्था 
अँटीजेन टेस्ट : रोज सरासरी 500 
शासकिय - आरटीपीसीआरद्वारे : 350 
शासकिय - सीबीनॅटद्वारे : 150 
खासगी - क्रस्ना लॅब : 100 
खासगी - मेट्रोपोलिस : 100


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona" unlocked in rural Solapur, 1688 possitive in lockdown and 1965 in unlocked