लसीकरणाला लागतात पाच ते सहा मिनिटे ! जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा "ड्राय रन' 

प्रमोद बोडके 
Saturday, 9 January 2021

कोरोनाची लस एका रुग्णाला देण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा मिनिटे वेळ लागला. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालय, अकलूज ग्रामीण रुग्णालय, बार्शी प्राथमिक आरोग्य केंद्र, होटगी आणि महापालिका क्षेत्रात दाराशा हॉस्पिटल येथे कोव्हिड लसीकरणाबाबतचा ड्राय रन घेण्यात आला. 

सोलापूर : कोरोनाची लस एका रुग्णाला देण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा मिनिटे वेळ लागला. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालय, अकलूज ग्रामीण रुग्णालय, बार्शी प्राथमिक आरोग्य केंद्र, होटगी आणि महापालिका क्षेत्रात दाराशा हॉस्पिटल येथे कोव्हिड लसीकरणाबाबतचा ड्राय रन घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. 

लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले असून त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार आहे. होटगी येथील लसीकरण बूथची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तथा लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. व्ही. मिसाळ, डॉ. सरोज पाटील आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात झालेल्या चार ठिकाणच्या ड्राय रनचे अनुभव काय आहेत, सर्व पद्धती अवलंबून लसीकरणाला किती वेळ लागला, सोयी-सुविधा यांची माहिती घेऊन काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय रुग्णांना काही लक्षणे दिसल्यास रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. 
- मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी 

प्रत्यक्ष कोरोनाची लस कशी दिली जाते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या प्रवेशापासून ते बाहेर जाण्यापर्यंतचे निरीक्षण नोंदविले. तपासणी, पडताळणी, लस, रुग्णाला सूचना आणि अर्धा तास प्रतीक्षेत ठेवण्यात आले. या ठिकाणी 25 रुग्णांना लस दिल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आलेल्या अडचणींच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत, त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. 
- दिलीप स्वामी, 
मुख्य कार्यकारी अधिकारी 

लसीकरणासाठी ऑनलाइन प्रणाली 
कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये अडचणी काय आल्या, त्यातून सकारात्मक काय करता येणार याची निरीक्षणे सर्व पथकांनी नोंदवली आहेत. लसीकरणासाठी प्रथमच ऑनलाइन प्रणालीचा वापर झाला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी लसीकरण प्रात्यक्षिकाची माहिती घेतल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination dry run was conducted at four places in Solapur district