esakal | Corona : गुढीपाडव्याला खरेदी केलेल्या वाहनांची पासिंग 15 दिवस लांबणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus effect in RTO

कोरोनामुळे सर्व आरटीओ कार्यालयातील पासिंग, वाहन परवाना नव्याने देणे अशी कामे थांबविली आहेत. अत्यावश्यक कामे केली जात असून दंडात्मक कारवाईदेखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवली आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, सोलापूर 

Corona : गुढीपाडव्याला खरेदी केलेल्या वाहनांची पासिंग 15 दिवस लांबणीवर

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : चीनमधील कोरोनाने आता राज्यात पाय पसरले आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य परिवहनच्या प्रादेशीक व उपप्रादेशीक परिहवहन कार्यालयातील वाहन परवाना, पासिंग अशा सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुढीपाडव्यानिमीत्त खरेदी केलेल्या वाहनांची पासिंग लांबणीवर पडणार आहे. तर बीएस-फोर वाहनांची नोंदणीची मुदत वाढवली जाईल, असेही आरटीओच्या वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारने वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून बीएस- फोर वाहनांचे उत्पादन थांबवले आहे. आता कंपन्यानी बीएस-6 वाहनांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. दरम्यान, बीएस-फोर वाहनांची पासिंग, नोंदणी 25 मार्चपूर्वी करुन घेण्याचे आदेश दिले. मात्र, कोरोनामुळे त्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसेच आरटीओ कार्यालयात वाहनचालकांनी येऊ नये, अत्यावश्यक कामे ऑनलाइन करुन घ्यावीत, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ज्यांच्या लर्निंग लायसंन्सची मुदत संपणार आहे, त्यांची कामे फक्त केली जात आहेत. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईदेखील काही दिवसांसाठी थांबवली असून वाहनचालकांना जपून वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मार्चएंडच्या उद्दीष्टपूर्तीवर परिणाम झाला आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहनांची खरेदी करताना वाहनचालकांनी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे सर्व आरटीओ कार्यालयातील पासिंग, वाहन परवाना नव्याने देणे अशी कामे थांबविली आहेत. अत्यावश्यक कामे केली जात असून दंडात्मक कारवाईदेखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवली आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, सोलापूर 
 

आरटीओच्या वाहनधारकांना सूचना...
- वाहनधारकांनी अत्यावश्यक कामांसाठीच कार्यालयात यावे 
- ऑनलाइन सेवांचा वाहनधारकांनी घ्यावा लाभ
- पासिंग, नव्याने वाहन परवाना देणे केले बंद ; 31 मार्चनंतर सेवा सुरु होईल
- वाहन परवाना देण्याचे तालुकास्तरीय क्याम्प मार्चएंडपर्यंत राहणार बंद 
- अधिकारी, कर्मचारी यांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा