निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! अडीचशे रुग्णांवरच थांबला 'प्रभाग चार'मधील कोरोना

तात्या लांडगे
Friday, 30 October 2020

नागरिकांनी हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई 
नगरसेवक अमित पाटील, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड व सुरेखा काकडे यांनी कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासत घरोघरी मास्क, सॅनिटायझर, साबण, धान्य वाटप केले. नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे या प्रभागातील नागरिकांनी कोरोनाविरुध्दची लढाई स्वत:च्या हातात घेतली. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत या प्रभागातील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर : 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या माहिमेपूर्वीच प्रभाग क्र. चारमध्ये प्रभागच माझे कुटूंब म्हणून तेथील नगरसेवकांनी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना धान्य, अल्पोपहार, सॅनिटायझर, मास्क, साबण अशा जिवनावश्‍यक वस्तू घरपोच दिल्या. त्याचवेळी हातावरील पोट असलेल्यांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. त्यामुळे प्रभाग क्र. चार कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करु लागला आहे. आता या प्रभागातील 248 पैकी अवघे 12 रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून उर्वरित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सारडा प्लॉट, वडार गल्ली, न्यू बुधवार पेठ, मराठा वस्ती, भवानी पेठ, बाळीवेस, भूसार गल्ली, सिध्देश्‍वर मार्केट, पूर्व मंगळवार पेठ या भागातील रुग्णसंख्या आता आटोक्‍यात आली आहे. मागील काही दिवसांत प्रभागातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर रुग्णांचा आलेखही खूपच कमी होऊन आता हा प्रभाग कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास या प्रभागातील नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे. कोरोनाच्या काळात अन्य आजारांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षताही नगरसेवकांनी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून घेतली. त्यांना मोफत औषधे देण्यात आली. तर रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील शंकाही दूर केली. त्यासाठी महापालिका प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय नेत्यांची मदत झाल्याचेही नगरसेवकांनी आवर्जून सांगितले.

आरोग्य शिबिरांतून नागरिकांची पाहिली सुरक्षितता
प्रभागातील कोरोना वाढू नये, कोरोनाचा बळी कोणीही ठरू नये या हेतूने बाळीवेस, भुसार गल्ली यासह सर्वच भागात सॅनिटायझर टनेल, हॅण्ड वॉश टाक्‍या बसविल्या. झोपडपट्टीत जगदीश पाटील मित्र परिवारातर्फे घरपोच अल्पोपहार, धान्य वाटप केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोफत तपासणी केली.
- अमित पाटील, नगरसेवक

घरपोच दिल्या जीवनावश्‍यक वस्तू
लॉकडाउन काळात कोरोनाच्या धास्तीने घरात थांबलेल्या नागरिकांना घरपोच धान्य वाटप केले. प्रभागात दोन- तीनवेळा सॅनिटायझरची फवारणी करुन घेतली. मास्क, साबण, सॅनिटायझरही घरोघरी वाटप केले. रुग्ण सापडलेल्या परिसरात फवारणी केली. आता नागरिक नियमांचे पालन करीत आहेत.
- सुरेखा काकडे, नगरसेविका

नागरिकांनी हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई
नगरसेवक अमित पाटील, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड व सुरेखा काकडे यांनी कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासत घरोघरी मास्क, सॅनिटायझर, साबण, धान्य वाटप केले. नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे या प्रभागातील नागरिकांनी कोरोनाविरुध्दची लढाई स्वत:च्या हातात घेतली. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत या प्रभागातील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus in Ward Four stopped at 248 patients