esakal | अक्कलकोट तालुक्‍यात कारहुणवीमुळे घरासमोर बैलांची पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Coronas effect on bull hive in Akkalkot taluka

अक्कलकोट शहर आणि तालुक्‍यात कारहुणवीचा सण कोरोनाच्या धास्तीत बैलजोडीचा मानसन्मान करण्यासाठी उत्साहाने झाला. यावेळी पांरपरिक धार्मिक विधी करण्यात आला.

अक्कलकोट तालुक्‍यात कारहुणवीमुळे घरासमोर बैलांची पूजा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहर आणि तालुक्‍यात कारहुणवीचा सण कोरोनाच्या धास्तीत बैलजोडीचा मानसन्मान करण्यासाठी उत्साहाने झाला. यावेळी पांरपरिक धार्मिक विधी करण्यात आला. कोरोना संकटात सार्वजनिकरीत्या कार्यक्रम न करता हा सण साजरा करण्यात आला. तालुक्‍यात अनेक गावांत बैलजोडी व अन्य पशुधनास सजवून नैवेद्य दाखविला. दरवर्षी सायंकाळी होणारा मानकऱ्यांच्या बैलाने कर तोडण्याचा कार्यक्रम यंदा झाला नाही. 
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट तालुक्‍यात या सणाला कारहुणवी म्हणतात. आजचा दिवस म्हणजे बैल व अन्य जनावरांना गोड नैवेद्य दाखविण्याचा आणि हक्काची विश्रांती देण्याचा दिवस. त्यामुळे त्यांना स्वच्छ करून रंग लावणे, साजशृंगार करणे, मालकाबरोबर छायाचित्र काढणे आदी कार्यक्रम होतात. पावसाळ्यात सुरवातीला सण येत असल्याने कमी-जास्त पावसानुसार सण साजरा करतात. मागील पंधरवड्यात दोन-तीन चांगले पाऊस झाले. शेतात मशागत चांगली झाल्याने वातावरण आनंदी दिसत होते. तालुक्‍यातील अक्कलकोट शहर, जेऊर, वागदरी, चपळगाव, दहिटणे, किणी, हन्नूर, बासलेगाव भागासह तालुक्‍यात संकटात सुद्धा धीर आणि संयम दाखवीत सणाचा उत्साह शेतकऱ्यांत दिसला. या भागात कारहुणवीस बैलजोडीचा सन्मान करतात. कर्नाटक सीमेलगतच्या गावात कारहुणवीला मोठे महत्त्व आहे. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्‍यात शेतकऱ्यांनी शेतात तर काहींनी घरासमोर बैलांची पूजा करून सण आनंदात साजरा केला.