गाळप हंगामाच्या तयारीत असलेल्या "विठ्ठल'च्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

भारत नागणे 
Friday, 30 October 2020

आर्थिक संकटावर मात करून गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच, गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारखाना परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आर्थिक संकटावर मात करून गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच, गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारखाना परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

एकाच वेळी जवळपास 28 ते 30 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कारखान्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने कारखान्याला थकहमी दिल्याने आर्थिक प्रश्न सुटला आहे. दसऱ्याच्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत गाळप हंगामाचा प्रारंभही करण्यात आला. त्यापूर्वीच कारखान्याचे संचालकसह कार्यकारी संचालक आणि वर्क्‍स मॅनेजर यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कारखान्यावर ऊसतोड मजूर आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन शेती अधिकारी, तीन इंजिनिअर, एक ऍग्री व्होरशियर यांच्यासह शेती विभागांतील चिटबॉय असे जवळपास 25 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच वेळी अधिकारी आणि कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कारखाना व्यवस्थापनावर परिणाम झाला आहे. सर्व रुग्णांवर पंढरपूर, अकलूज आणि वाखरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कारखाना परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. सरडे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus infection of directors, officers and employees of Vitthal Sugar Factory