#coronavirus : सोलापूरकर काढताहेत गल्लीबोळातून वाट 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने जाहीर केलेली संचारबंदी सर्वांच्या हितासाठी आहे. अत्यावश्‍यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. पोलिसांकडून चौकाचौकात नाकाबंदी केली असून बाहेर पडण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसेल, ओळखपत्र नसेल तर कारवाई केली जात आहे. 
- बाळासाहेब शिंदे, 
सहायक पोलिस निरीक्षक

सोलापूर : संसारबंदीत वाहने घेऊन रस्त्यावर येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे, अशातच काहीजण गल्लीबोळातून वाट काढताना दिसून येत आहे. नाकाबंदीत सापडलेल्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी आदेश काढून अंमलबजावणीला सुरवात केली आहे. मंगळवारी सकाळच्या टप्प्यात रस्त्यांवर काही प्रमाणात गर्दी होती, पण दुपारनंतर गर्दी कमी झाली. कोणत्याही ठोस कारणाशिवाय वाहन घेऊन रस्त्यावर आलेल्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. आसरा चौक, गांधी नगर, सात रस्ता, विजापूर नाका, सैफुल, पुना नाका, बाळीवेस परिसर, दयानंद कॉलेज परिसर, मार्केट यार्ड परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे. 

काहीजण पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी गल्लीबोळातून मार्ग काढत बाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. अशांवर गस्तीवर असलेल्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. 23 मार्च रोजी नाकाबंदीवेळी शहरात 76 जणांवर कारवाई करण्यात आली होती. 

मी पत्नीला आणायला चाललो आहे.. 
कारवाईवेळी पोलिसांना वेगवेगळे अनुभव येत आहेत. काहीजण खोटे बोलून सुटका करून घेताना दिसत आहेत. गांधी नगर येथे मंगळवारी सायंकाळी नाकाबंदीवेळी एका तरुणास पोलिसांना अडविले. त्याने मी पत्नीला आणायला निघालो आहे.. असे सांगून पत्नीचे ओळखपत्र दाखवून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने जाहीर केलेली संचारबंदी सर्वांच्या हितासाठी आहे. अत्यावश्‍यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. पोलिसांकडून चौकाचौकात नाकाबंदी केली असून बाहेर पडण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसेल, ओळखपत्र नसेल तर कारवाई केली जात आहे. 
- बाळासाहेब शिंदे, 
सहायक पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus news at solapur