
आधी उत्पादन चांगले होते तर कोरोनामुळे मागणी नव्हती. नंतर पिके तरारून आली होती तर अतिवृष्टीमुळे ते सडून गेली होती. अशा एकामागे एक बिकट प्रसंगांना सामोरे जात, शेतकरी अडचणीत असूनही त्याने आर्थिक जुळवाजुळव करून भाजीपाला पिकांची लागवड केली. मात्र आता ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
केत्तूर (सोलापूर) : सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने पोमलवाडी (ता. करमाळा) येथील युवा शेतकरी विकास मगर यांनी आपल्या अर्धा एकर शेतात लावलेले दोडक्याचे पीकच उपटून टाकले आहे. दीड महिन्यापूर्वी मगर यांनी पंचवीस हजार रुपये खर्च करून सतराशे दोडक्याची रोपे लावली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी बाजारपेठेत नागरिक गर्दी करत आहेत. मागील काही दिवसांत भाजीपाल्याचे दर कडाडले होते. परंतु सध्या मात्र बाजारात भाजीपाल्याची आवक अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर एकदम कोसळले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्यासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. कोथिंबीर, मेथी तसेच इतर भाजीपाला पिके भरपूर प्रमाणात आली असली तरी दर मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.
आधी उत्पादन चांगले होते तर कोरोनामुळे मागणी नव्हती. नंतर पिके तरारून आली होती तर अतिवृष्टीमुळे ते सडून गेली होती. अशा एकामागे एक बिकट प्रसंगांना सामोरे जात, शेतकरी अडचणीत असूनही त्याने आर्थिक जुळवाजुळव करून भाजीपाला पिकांची लागवड केली. मात्र आता ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीड नियंत्रणासाठी महागडी कीटकनाशके फवारणी करूनही खर्च मात्र वाढत असल्याने संकटात भरच पडत आहे.
भाजीपाला पिकाचे दर अचानकपणे कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यातच बदलत्या हवामानामुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे फक्त खर्च करण्यापेक्षा पीकच उपटलेले बरे म्हणून दोडक्याचे संपूर्ण पीक काढून टाकले आहे.
- विकास मगर,
शेतकरी, पोमलवाडी, ता. करमाळा
संपादन : श्रीनिवास दुध्याल