माढ्यात कोविशिल्ड लसीकरणाला प्रारंभ ! 970 डोस उपलब्ध 

किरण चव्हाण 
Tuesday, 26 January 2021

माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (ता. 25) कोरोनावरील कोविशिल्ड लसीकरणाला सुरवात झाली असून, माढा तालुक्‍यासाठी 970 डोस उपलब्ध झाले आहेत. तालुक्‍यात लसीकरणाचा पहिला मान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार घोळवे यांना मिळाला आहे. 

माढा (सोलापूर) : माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (ता. 25) कोरोनावरील कोविशिल्ड लसीकरणाला सुरवात झाली असून, माढा तालुक्‍यासाठी 970 डोस उपलब्ध झाले आहेत. या लसीकरणाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस, डॉ. प्रीती भंडारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. धनराज कदम, डॉ. अमोल शिंदे, डॉ. कोल्हे, डॉ. रईस मुल्ला, जिल्हा परिवेक्षक विजय कदम व श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. 

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसींचे डोस उपलब्ध झाले असून दररोज शंभर कर्मचारी याप्रमाणे पाच दिवस लसीकरण होणार असून, प्रथमतः लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरा बूस्टर डोस 28 दिवसांनंतर घेणे बंधनकारक आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम करून ही लस तयार केली आहे. लसीबाबत मनामध्ये भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे. आपला भारत देश कोरोनामुक्त होण्यास मदत करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी या वेळी केले. 

कोविशिल्ड लसीकरण केल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस यांनी केले. आमदार बबन शिंदे यांनी लसीकरण केंद्राला दुपारी भेट देऊन पाहणी केली. 

तालुक्‍यात लसीकरणाचा पहिला मान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार घोळवे यांना मिळाला आहे. या वेळी अधिकारी वर्ग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह वैद्यकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covishield vaccination was started at Madha Rural Hospital