esakal | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या भूमिपूजनावरून दोन आमदारांमध्ये श्रेयवाद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhalke-Paricharak

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय श्रेयवाद चव्हाट्यावर आला आहे. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या भूमिपूजनावरून दोन आमदारांमध्ये श्रेयवाद ! 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय श्रेयवाद चव्हाट्यावर आला आहे. 

पंढरपूर - सांगोला राष्ट्रीय महामार्गामुळे सांगोला चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा बाधित झाली आहे. त्यामुळे शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नगरपालिकेने नवीन भक्तनिवास शेजारी चार हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आपसुकच भूमिपूजनाचा मान आमदार भालके यांना मिळाला. त्यानुसार शनिवारी (ता. 24) राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या हस्ते व प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन पार पडले. दरम्यान, या कार्यक्रमाला नगराध्यक्षांसह भाजप पुरस्कृत शहर विकास आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी अनुपस्थित होते. 

आमदार भालके यांनी भूमिपूजन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विजया दशमीच्या दिवशी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आणि नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या उपस्थितीत त्याच ठिकाणी जागेचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

एकाच जागेचे आमदार महोदयांनी दोन वेळा भूमिपूजन केल्याने पुन्हा एकदा भालके - परिचारक यांच्यातील राजकीय श्रेयवाद पाहायला मिळाला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल