अक्कलकोट तालुक्‍यात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यावर सहा जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

भविष्यातही होणार कारवाई 
उडगी परिसरात शिकार करणाऱ्यावर कारवाई करून कायद्याने योग्य शिक्षा दिली जाईल. यापुढे सातत्याने कडक कारवाई केली जाणार असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आरोपींना तीन ते सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. 
- प्रकाश डोंगरे, वनपाल, अक्कलकोट 

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट येथील वनविभागाने वन्यजीव संरक्षण कलम कायद्यानुसार सातनदुधनी, उडगी व बासलेगाव परिसर शिकार प्रकरणी सहा संशयित आरोपीवर नुकताच गुन्हा दाखल केला होता. यातील चार संशयितांना शिकारीच्या साहित्यासह अटक केली होती. 
दरम्यान, त्यांची आज पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दुसरे दोन संशयित आरोपी कर्नाटक येथे गेल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना लवकरच अटक करून कोर्टासमोर हजर केले जाईल, अशी माहिती वनरक्षक प्रकाश डोंगरे यांनी दिली. अटक केलेल्यांमध्ये सागर भिमशा कोळी, लक्ष्मण भिमशा कोळी, हणुमंत यलप्पा कोळी, धर्मण्णा तमण्णा कोळी (सर्व रा. सातनदुधनी, ता. अक्कलकोट) यांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी त्यांना कोर्टात उभे केले असता दोन दिवसाची वनकोठडी मिळाली. श्रीमंत तमण्णा कोळी व पिंटु लक्ष्मण कोळी हे दोन फरार संशयित आरोपींची नांवे आहेत. या सर्वांनी मुंगुस, तितर व कोल्हा या प्राण्यांची शिकार केली होती. अक्कलकोट तालुक्‍यातील ग्रामीण भागात राजरोसपणे वन्यजीवांची शिकार होत असल्याच्या सतत तक्रारी होत्या. याची दखल घेत वनविभागाने तातडीने यावर कारवाई केली. या कारवाईत उप वनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आर. एन. नागटिवक, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शेख, अक्कलकोट वनपाल प्रकाश डोंगरे, उत्तर सोलापूर वनपाल चेतन नलावाडे, दक्षिण सोलापूर वनपाल भागा शेळके, मैंदर्गी वनरक्षक जी. एन. विभुते, वनरक्षक एस. एस. मेंगाड, वनमजुर मुन्ना नरोणे, रविकांत ढब्बे, आकाश पाटोळे, सचिन भासगी आदींनी सहभाग नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against six people for hunting wild animals in Akkalkot taluka