अंध महिलेला फसवून सालगड्यानेच खरेदी करवून घेतली 42 एकर जमीन; वाचा शहरातील गुन्हे वृत्त 

तात्या लांडगे 
Saturday, 17 October 2020

उमरगे (ता. अक्‍कलकोट) येथील चंद्रलेखा विठोबा जाधव यांच्यासोबतच्या ओळखीचा फायदा घेत त्यांची आई अडाणी व अंध असल्याने "आरडी' खात्यातील ठेव आणि त्यांच्या नावावरील 42 एकर जमीन बळकावल्याप्रकरणी संशयित आरोपी मल्लिनाथ नारायण पाटील याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी फेटाळला. 

सोलापूर : उमरगे (ता. अक्‍कलकोट) येथील चंद्रलेखा विठोबा जाधव यांच्यासोबतच्या ओळखीचा फायदा घेत त्यांची आई अडाणी व अंध असल्याने "आरडी' खात्यातील ठेव आणि त्यांच्या नावावरील 42 एकर जमीन बळकावल्याप्रकरणी संशयित आरोपी मल्लिनाथ नारायण पाटील याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी फेटाळला. 

फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मल्लिनाथ पाटील याने संबंधितांना 42 लाख रुपये दिल्याचे खोटे भासवून त्यांच्या लहान मुलाच्या नावावर शेती करवून घेतली. दरम्यान, संशयित आरोपीच्या खात्यात दीड लाखावर रुपये आढळले नाहीत. तर तो सालगडी म्हणून काम करतो, त्यामुळे 42 एकर जमीन खरेदी करण्याची त्याची कुवत नाही, असा युक्‍तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्याने हातउसने पैसे घेतल्याचे पुरावेही खोटे दिल्याचे या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार त्याचा जामीन फेटाळण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर संशयित आरोपीतर्फे ऍड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले. 

चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले 
जुना तुळजापूर नाका येथील ब्रीजखाली गुरुवारी (ता. 15) सकाळी सहा वाजता ट्रक बंद पडल्याने ट्रकचालक विकासकुमार माणिक भारतीय (रा. बलिपूर, उत्तरप्रदेश) हे त्या ठिकाणी थांबले होते. त्या वेळी दोन अनोळखी तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून विकासकुमार यांच्या खिशातील मोबाईल चोरला. तसेच त्या वेळी त्या तरुणांनी त्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रोकडही लंपास केली. या प्रकरणी जोडभावी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक श्री. बोराडे पुढील तपास करीत आहेत. 

गळ्यातील दागिने अन्‌ खिशातील रोकड लंपास 
मित्राला भेटण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विलास कलप्पा बिराजदार (रा. दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) हे आले होते. मित्राला भेटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी बिराजदार हे जुना पूना नाका येथील ब्रीजखाली थांबले होते. त्या वेळी अनिल ननवरे व अनिता ननवरे (रा. बोरामणी) हे दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चैन आणि खिशातील 42 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर शिवीगाळ करून, तुला सोडणार नाही म्हणून धमकी देऊन निघून गेले, अशी फिर्याद बिराजदार यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक श्री. देशमाने पुढील तपास करीत आहेत. 

घरगुती भांडणातून मारली घरावरून उडी 
येथील गेंट्याल टॉकीजजवळील रुक्‍मिणी कॉम्प्लेक्‍स येथे घरगुती भांडण सुरू असल्याची माहिती सदर बझार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस नाईक भाऊसाहेब दळवे त्या ठिकाणी पोचले. त्या वेळी कविता विटकर व मुलगी आरती विटकर यांच्यात घरगुती कारणावरून भांडण सुरू असल्याचे दिसून आले. या दोघींचे भांडण सोडविताना विठ्ठल विटकर यांच्या डोक्‍याला मार लागून रक्‍त येत होते. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यास सागत असताना आरती विटकर हिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. घरावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरती विठ्ठल विटकर हिच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विठ्ठल विटकरविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खासगी सावकारकीप्रकरणी शिंदेला जामीन 
खासगी सावकारकीला कंटाळून अनिल नागनाथ चांगभले (रा. जुनी मिल चाळ) यांनी आत्महत्या केली. चांगभले यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा शिंदे याच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर किरण शिंदे याने जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाठवदकर यांनी किरण शिंदे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात संशयित आरोपी शिंदे याच्यातर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ऍड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city