भांडणात मध्यस्थी केल्याने रॉडने मारहाण ! वाचा शहर व परिसरातील गुन्हेगारी वृत्त 

प्रमोद बोडके 
Monday, 23 November 2020

मागील भांडणाचा राग मनात धरून व भांडणात मिटवामिटवी का केली म्हणून लाथाबुक्‍क्‍यांनी व लोखंडी रॉडने व चॉपरने मारहाण केल्याची फिर्याद तौफिक जावेद बागवान (वय 30, रा. मुक्तेश्वर नगर, शेळगी) यांनी पोलिसात दिली आहे. 

सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून व भांडणात मिटवामिटवी का केली म्हणून लाथाबुक्‍क्‍यांनी व लोखंडी रॉडने व चॉपरने मारहाण केल्याची फिर्याद तौफिक जावेद बागवान (वय 30, रा. मुक्तेश्वर नगर, शेळगी) यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून मशाक गुंडूलाल तांबोळी, जुबेर शेख, मलिक गुंडूलाल तांबोळी, नबीलाल रजाक शेख, अरबाज शेख (सर्व रा. शेळगी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ 
शेळी व पिल्लांची चोरी करण्यासाठी आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ केली व पळून गेल्याची फिर्याद सुरेखा मनोज जाधव (वय 40, रा. राम मंदिर, लिमयेवाडी, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून आशुतोष ऊर्फ दिनेश जाधव व त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी लिमयेवाडी परिसरात घडली. 

ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने एकाचा मृत्यू 
भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर चालविल्याने झालेल्या अपघातात राजेश माणिकप्पा हिटनळ्ळी (वय 52, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रदीप राजेश हिटनळ्ळी (वय 25, रा. माजी सैनिक नगर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रंगप्पा रेवप्पा कोळी (रा. कुसुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंजुनाथ नगरमध्ये 29 हजारांचा ऐवज लंपास 
सोलापुरातील मंजुनाथ नगर परिसरातील सोनू किराणा दुकानाजवळील घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने 29 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्याने एक गॅस टाकी, होम थिएटर, 3 पितळी घागरी, एक पितळी बादली व एक तोळ्याचे सोन्याचे गंठण असा 29 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सचिन बन्सी दुपारगुडे (वय 32, रा. मंजुनाथ नगर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city